मुंबई - भारतीय नौदलातून निवृत्त झालेली विमानवाहू युद्धनौका आएनएस विराटच्या तोडकामाला सुरुवात झाली आहे. मात्र, हे काम त्वरीत थांबवावे, यासाठी शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी पुढाकार घेतला आहे. जगातल्या अनेक देशात युद्धसंबंधित संग्रहालय आहेत. युद्धाच्या काळात वापरल्या गेलेल्या शस्त्रांचे जतन करून, हा वारसा पुढे नेला जातो. मात्र भारतात अशी संग्रहालय फार कमी आहेत. त्यामुळे ही युद्ध नौका वाचवून त्यावर संग्रहालय करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत त्यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र देखील लिहिले आहे.
काय म्हणाल्या प्रियंका चतुर्वेदी?
पत्रात चतुर्वेदी यांनी लिहिले आहे की, या ऐतिहासिक युद्धनौकेचे पुनरुज्जीवन व जतन करण्यात महाराष्ट्र आनंदित आहे. यामुळे आयएनएस विराटच्या संरक्षणासाठी एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) देण्यासाठी त्वरित हस्तक्षेप करा, अशी मागणी त्यांनी केली. गुजरातमधील अलांगमध्ये आयएनएस विराटला जंकमध्ये बदलण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ही अत्यंत वाईट आणि काळजीची बाब आहे, असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान 'आएनएस विराट'ने तब्बल 30 वर्ष देशाची सेवा केली आहे. दुसऱ्या महायुद्धातही या युद्धनौकेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ऑपरेशन ज्युपिटर आणि ऑपरेशन परक्रमामध्येही या युद्धनौकेचे समावेश होता. त्यामुळे ही युद्धनौका न तोडता त्यावर संग्रहालय करावे अशी मागणी प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे. गेल्या 6 वर्षांमध्ये आयएनएस विक्रांत आणि आयएनएस विराट अशा दोन युद्धनौका भंगारात काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुढच्या पिढीला चुकीचा संदेश जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.