मुंबई - शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीचा सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केला आहे. मात्र इंद्राणी मुखर्जीच्या अडचणी कमी होताना दिसत नाही. विशेष सीबीआय कोर्टाने जामीन मंजूर करताना 2 लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन दिला आहे. मात्र, अद्यापही जातमुचलक्यावर जामीनदार मिळत नसल्याने इंद्राणी मुखर्जीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कोर्टाकडून इंद्राणीला दिलेल्या वेळेत जर जामीनदार देण्यात आला नाही तर इंद्राणीचे जामीन देखील रद्द होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - Salman Khan Threat Case : सलमान खान धमकीप्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचचे संग्राम सिंह चौकशीसाठी पुण्यात दाखल...
इंद्राणी मुखर्जीने जामीनदार देण्याची मुदत वाढवून देण्यासाठी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टामध्ये अर्ज केला आहे. इंद्राणी मुखर्जीला यापूर्वी न्यायालयाने दोन आठवड्यांचा वेळ दिला होता. ही वेळ पुन्हा वाढून देण्यात यावी याकरिता अर्ज करण्यात आला आहे. या अर्जामध्ये माझा मोबाईल सीबीआयकडे असल्याने मी माझ्या ओळखीच्या लोकांशी संपर्क साधू शकत नाही, त्यामुळे मला आणखी काही वेळ देण्यात यावा, अशी विनंती इंद्राणी मुखर्जीने केली आहे.
एकेकाळी करोडो रुपयांची मालकीन असलेल्या इंद्राणीकडे पैसा आहे, मात्र जामीन म्हणून उभे राहणारे लोक नाहीत. इंद्राणी मुखर्जी जामीनदार देण्यासाठी सतत वेळ मागत आहे. कोर्टात तिच्या वकिलाने सांगितले की, तिचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. ती 6.5 वर्षे तुरुंगात होती, त्यामुळे लोकांशी संपर्क तुटला होता आणि त्यामुळेच, कोर्टाकडे आणखी वेळ मागितला आहे.
इंद्राणी मुखर्जीला 18 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. विशेष सीबीआय न्यायालयाने रजेवर असल्याने 18 मे रोजी प्रभारी न्यायालयाने इंद्राणीला जामिनावर सोडण्यासाठी अटी निश्चित केल्या होत्या. इंद्राणीला स्थानिक सॉल्व्हेंटकडे 2 लाख रुपयांचा बॉण्डही भरण्याचे आदेश दिले होते. यासाठी तिला दोन आठवड्यांचा कालावधी देण्यात आला होता. जो 19 मे रोजी सुरू झाला होता आणि 1 जून रोजी संपला आहे.
विशेष सीबीआय न्यायाधीश एस.पी. नाईक निंबाळकर यांनी सांगितले की, दोन आठवड्यांची मुदत 1 जून रोजी संपली आहे. आणि इंद्राणीने पुन्हा न्यायालयात धाव घेतली आहे. इंद्राणीचे वकील सना रईस खान यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद केला की, त्या सध्या जामीनपत्र भरण्यास असमर्थ आहेत. बॉण्ड भरण्यास आणखी वेळ लागेल. त्यामुळे वकील सना रईस खान यांनी 8 आठवड्यांचा वेळ मागितला. मात्र, सरकारी वकील अभिनव कृष्णा यांनी या अर्जावर जोरदार आक्षेप घेतला, पुरेसा वेळ आधीच देण्यात आला आहे मुदतवाढीसाठी कोणतेही योग्य कारण दिलेले नाही, त्यामुळे अर्ज फेटाळण्यात यावा, असा आक्षेप कृष्णा यांनी घेतला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश नाईक निंबाळकर म्हणाले, परिस्थिती लक्षात घेऊन इंद्राणीला आणखी वेळ देत आहोत. मात्र, 8 आठवडे थोडे जास्त आहेत, म्हणून 4 आठवड्यांचा वेळ देत आहोत.
काय आहे प्रकरण? - इंद्राणी मुखर्जीने एकूण तीन लग्न केली आहेत. ज्यात प्रथम तिला पतीपासून मुलगी झाली. तिचे नाव शीना बोरा होते. इंद्राणी मुखर्जीचा तिसरा नवरा पीटर मुखर्जी याचा मुलगा आणि शीना बोराचे अफेअर असल्याचे सांगितले जाते. इंद्राणी आणि पीटर मुखर्जी दोघेही यामुळे अस्वस्थ होते. एप्रिल 2012 मध्ये नवी मुंबईजवळील जंगलात 24 वर्षीय शीनाची कारमध्ये गळा आवळून हत्या करण्यात आली होती आणि शेजारच्या रायगड जिल्ह्यात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती. 2015 मध्ये ही हत्या उघडकीस आल्यानंतर इंद्राणीशिवाय तिचा ड्रायव्हर श्यामवर राय आणि संजीव खन्ना यांनाही मुंबई पोलिसांनी अटक केली होती. इंद्राणीचा पती पीटर यालाही नंतर या प्रकरणात आरोपी बनवून अटक करण्यात आली होती. तपासानुसार शीनाच्या राहुलसोबतच्या संबंधांना इंद्राणीचा विरोध होता. याशिवाय आर्थिक वाद हा हत्येमागील संभाव्य कारण होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. या प्रकरणी इंद्राणी मुखर्जी 2015 पासून मुंबईतील भायखळा कारागृहात बंद होती.
हेही वाचा - Hitendra Thakur : हितेंद्र ठाकूर यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात!