मुंबई- देशात दिवसेंदिवस सोन्याचा दर हा वाढत चाललेला आहे. यालाच अनुसरून मुंबईसारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी करण्याचे प्रमाणही वाढले असल्याचे डीआरआयच्या एका कारवाईवरून समोर आले आहे. देशातील विविध राज्यांमध्ये आणि विशेषत: मुंबई शहरामध्ये सोन्याची तस्करी करणारी टोळी सध्या मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे.
डीआरआयकडून या तस्करीवर अंकुश ठेवण्यासाठी नेहमीच मोठी कारवाई केली जाते. या अगोदर आखाती देशांमधून मुंबईत तस्करीच्या मार्गातून सोने आणले गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत. रविवारी सकाळी 7 वाजता मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवर हवडा एक्सप्रेसने कलकत्ता येथून कोट्यवधी रुपयांचे सोने घेऊन येणाऱ्या गोपाराम या आरोपीला तब्बल 6 किलो 900 ग्रॅम सोन्यासह अटक करण्यात आली आहे.
बांगलादेशच्या माध्यमातून तस्करी करून मुंबईतील काळबादेवी येथे साहिल जैन या सोने व्यापाऱ्याला देण्यासाठी आरोपी गोपाराम हा मुंबईत आला होता. मात्र, डीआरआयला मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यास सापळा रचून अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीने त्याच्या कबुली जबाबात म्हटले आहे की, मुंबईतील सोने व्यापारी साहिल जैन यास फेब्रुवारीपासून आतापर्यंत तब्बल 180 किलो सोने तस्करीच्या माध्यमातून त्याने विकले आहे. या संदर्भात चौकशी दरम्यान साहिल जैन यास अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.
डीआरआयच्या सुत्रांच्या माहितीनुसार मागील आठ महिन्यांत जवळपास 3000 किलो सोन्याची तस्करी समोर आली आहे. याची किंमत जवळपास 1000 कोटींपेक्षा अधिक असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सोन्याची ही तस्करी जरी नवीन नसली तरी, कोट्यवधींचा हा व्यवसाय असून त्यात एक मोठे रॅकेट सध्या सक्रिय आहे. भारतात सोन्याची सतत मागणी असून सध्या सोन्याची किंमत वाढली आहे. कायदेशीर इंपोर्ट केल्या जाणाऱ्या सोन्यावर 10 टक्के इंपोर्ट ड्युटी लागते. आणि 3 टक्के जीएसटी खर्च पकडून एकूण 13% कर द्यावा लागतो. तस्करी केलेल्या सोन्यावर हा खर्च लागत नाही. तस्करीच्या माध्यमातून शासनाचा कर चुकवून करोडो रुपयांचा नफा सध्या कमविला जात आहे. याचे उदाहरण द्यायचे झाले तर तस्करीच्या माध्यमातून 1 किलो सोने विकत घेतल्यास जवळपास 5 लाख रुपयांचा कर सोने व्यापाऱ्यांना आपल्या खिशात घालता येतो. भारतीय बाजारात जवळपास 110 टन सोने दरवर्षी अनधिकृतरित्या तस्करीच्या माध्यमातून आणले जात आहे.