मुंबई - एकीकडे महाविकास आघाडी सरकार अखेरच्या घटका मोजत आहे. तर दुसरीकडे भाजपच्या गोटात सत्ता स्थापन करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( ShivSena rebel leader Eknath Shinde ) यांनी पुकारलेल्या बंडाचा आजचा पाचवा दिवस आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Leader of Opposition Devendra Fadnavis ) यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी आजही फडणवीस यांच्या भेटीसाठी नेत्यांची रिघ लागली आहे. भाजपा आमदार, खासदार, नेते भेटीस तर येतच आहेत. याशिवाय अपक्ष आमदारही देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी त्यांच्या शासकीय बंगल्यावर दाखल होत आहेत.
आमदार रवी राणाही आले - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, आशिष शेलार, गिरीश महाजन, मंगल प्रभात लोढा अतुल भातखळकर हे सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत. याशिवाय अपक्ष आमदार रवी राणा देखील फडणवीस यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहेत.
भाजपाच्या गोटात मोठी खलबतं सुरू आहेत. मात्र जोपर्यंत एकनाथ शिंदे हे आपली पुढची भुमिका किंवा रणनीती स्पष्ट करत नाहीत. तोपर्यंत भाजपा आपले पत्ते किंवा रणनीती स्पष्ट करणार नाही, अशी भूमिका सध्या भाजपने घेतली आहे. यासंदर्भात एकाही भाजपा नेत्याला मीडियाशी न बोलण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत. दरम्यान, एकीकडे वर्षावर आणि सिल्व्हर ओकवर सरकार वाचवण्यासाठी अखेरपर्यंत बैठकांवर बैठका घेतल्या जात आहेत. तर दुसरीकडे सागर बंगल्यावर एकनाथ शिंदे गटाला बरोबर घेऊन सत्ता स्थापन करण्यासाठी रणनीती आखली जात आहे.
हेही वाचा - Social worker Teesta Satalwad : सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सतलवाड यांच्या घरी गुजरात ATS पोलीस पोहोचले