मुंबई - बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या असानी चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रात जाणवणार आहे. आज दिवसभर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अलिबाग, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली आदी ठिकाणी वातावरण ढगाळ राहणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विटरवरून दिली आहे.
हवामान खात्याचा इशारा - पश्चिम नगराच्या उपसागरात निर्माण झालेले असानी चक्रवादळ आंध्र किनारपट्टी जवळ पोहोचले आहे. समुद्राला उधाण आले असून 120 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. काही भागात मुसळधार पाऊस होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. महानगरातील अनेक भागात पाणी साचले आहे. काकीनाडा ते विशाखापट्टनमच्या दिशेने वादळ निघाले असून १२ मे पर्यंत विशाखापट्टनम जवळील समुद्रात सामावणार आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर समुद्राच्या किनारपट्टीवर राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. मासेमारी करणाऱ्यांनाही समुद्रात जाऊ नका, असा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा - Asani cyclone : 'असानी'चा धोका नाही! अनेक राज्यात पाऊस; हवामान विभागाचा अंदाज
राज्यात ढगाळ वातावरण - असानी चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रातील काही भागात जाणवणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा या भागात ढगाळ वातावरण राहील. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, कर्नाटक आणि केरळ मध्ये सुद्धा वादळाचा परिणाम होणार असल्याने दिवसभर ढगाळ वातावरण राहील, असे भारतीय हवामान विभागाचे प्रमुख होसाळीकर यांनी सांगितले तसेच काही भागात पावसाची शक्यताही त्यानी वर्तवली.