मुंबई - राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा अशी विनंती करण्यासाठी बुधवारी (1 सप्टेंबर ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्य मंत्रिमंडळाने ठरवून दिलेल्या 12 सदस्यांच्या नावाबाबत या भेटी दरम्यान कोणतीही चर्चा झाली नाही. मात्र, नजीकच्या काळात निवडणुकीमध्ये पराजय झालेल्या सदस्यांची नावे तत्काळ राज्यपाल नामनिर्देशित सदस्यांसाठी देता येतात किंवा नाही? याबाबत सरकार पडताळणी करत आहे. या कारणामुळे दिलेल्या यादीमध्ये काही नावांबाबत अडचण निर्माण झाल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याबाबत निर्णय घेतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. त्यामुळे या यादीतून अशी नावे वगळली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा - बिग बॉस फेम सिद्धार्थ शुक्ला याचं निधन, वयाच्या ४० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
- एकनाथ खडसे आणि राजू शेट्टी यांच्या नावाबाबत उद्भवू शकते अडचण -
2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते राजू शेट्टी यांचा पराजय झाला होता. त्यामुळे राज्यपाल नामनिर्देशित सदस्यांच्या यादीमध्ये या नावांची अडचण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या नावांबाबत राज्यपालांना निर्णय घेताना तांत्रिक अडचणी आल्यास मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकतील अशी शक्यता वर्तवली आहे.
- पालकमंत्र्यांकडून पूर आलेल्या जिल्ह्यांची पाहणी -
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. काल याबाबत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा झाली. तसेच या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री आज त्या जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. तसेच जिल्हाधिकार्यांना देखील पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शेतकरी तसेच सामान्य नागरिकांना राज्य सरकारकडून लवकरात लवकर मदत दिली जाणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
हेही वाचा - आमदार नियुक्ती प्रलंबित ठेवण्यामागे राज्यपालांवर राजकीय दबाव असेल -संजय राऊत