मुंबई - येणाऱया निवडणुका महाविकास आघाडातील तीनही पक्ष एकत्र लढवणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, महाविकास आघाडीने एकत्र निवडणुका लढवल्या पाहिजेत, माझी तशी इच्छाच असल्याचे विधान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी फडणवीस बोलत होते.
येत्या काळात भाजपमध्ये अनेकांचा प्रवेश होणार
आगामी काळात भाजपमध्ये अनेकांचा प्रवेश होणार आहे. काहीजण उगाचच वावड्या उठवत आहेत. तसेच भाजप सोडून कुणीही जाणार नसल्याचे सांगत फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.
तिन्ही पक्षाने एकत्रित निवडणुका लढल्यास आमचा फायदाच - फडणवीस
फडणवीस म्हणाले, की काही लोक रोज वावड्या उठवत आहेत, की भाजपचे आमदार आमच्याकडे येणार आहेत, मात्र कोणीही भाजप सोडणार नाही. त्यांच्याकडे अस्वस्थता आहे. त्यांचे त्यांनाच माहीत नाही काय चाललंय ते. त्यांचे आमदार अस्वस्थ आहेत. देशाचे भवितव्य नरेंद्र मोदी यांच्यावर आहे. धोक्याने आलेले सरकार किती दिवस चालणार. माझी इच्छा आहे तिघांनी एकत्र लढावे, ते मोकळी स्पेस सोडणार आहेत आणि त्याचा फायदा भाजपला होणार आहे. या तीन पक्षांनी आपल्याला संधी दिली आहे.
शिवसेनेला मोठा धक्का ! बाळासाहेब सानप पुन्हा भाजपमध्ये
सानप भाजपचे नाशिक महापालिकेतील पहिले महापौर राहिले होते. ते भाजपच्या तिकीटावर 2014 साली नाशिक पूर्वमधून आमदार झाले. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीतून विधानसभा निवडणूक लढवली. विधानसभा निवडणुकीत सानप यांचा पराभव झाला, त्यानंतर सानप यांचा शिवसेनेत प्रवेश केला. नाशिक पूर्व भागात सानप यांची मोठी ताकद आहे. गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख आहे. नाशिक पालिकेवर भाजपला एकहाती सत्ता मिळवण्यास त्यांची मोठी मदत झाली आहे. त्यांच्या भाजप पक्षप्रवेशाने आगामी नाशिक पालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसणार आहे.