मुंबई - कोरोना लसींअभावी राज्यातील लसीकरण केंद्र बंद झाली असताना, महाराष्ट्र दिनाच्या मुहुर्तावर राज्यात १ मे पासून १८ ते ४४ वयोगटापर्यंतच्या व्यक्तींना लस देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. लस अतिशय कमी स्वरुपात उपलब्ध असल्याने सुरुवातीला राज्यातील निवडक केंद्रावर लस दिली जाईल. मात्र, ज्यांची नोंदणी होईल, त्यांनीच केंद्रावर जाऊन लस घ्यावी, असे आवाहन मंत्री टोपे यांनी केले. मुख्यमंत्री याबाबत अधिकृत घोषणा करतील, असेही ते म्हणाले.
केंद्राच्या सुचनेनुसार खासगी केंद्रावर लस -
४५ वयोगटावरील नागरिकांसाठी भारत सरकारच्या सुचनेसार लसीकरण मोहीम राबवली जात आहे. केंद्राच्या नियमावलीने चालणारा हा कार्यक्रम आहे. सुमारे ४ हजार २०० लसीकरण केंद्र राज्य सरकारने सुरू केले आहेत. ज्यांचा दुसरा डोस घेणे शिल्लक आहे, अशा नागरिकांना सरकारी केंद्रावरच लस दिली जाईल. केंद्र सरकारचे म्हणणे असेल की खासगी केंद्रांवर आणि रुग्णालयांत लसीकरण करू नये, तर त्याची अंमलबजावणी करावी लागेल, असे देखील राजेश टोपे म्हणाले.
आठ लाखांची क्षमता -
मे महिन्यात १३ ते १४ लाख लसीचे डोस दिले जातील, असे सिरमने पत्र दिले आहे. तर भारत बायोटेक कोवॅक्सिनचे चार ते साडेचार लाख डोस देणार आहे. एकूण १८ लाखांपर्यंत लस उपलब्ध होतील. त्यादृष्टीने १८ ते ४४ वयोगटासाठी कमी केंद्रांवर लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. लसीकरणात सातत्य राहावे, हा या मागचा उद्देश आहे, असे मंत्री टोपे म्हणाले. राज्यात दिवसाला साडेपाच लाख लोकांचे लसीकरण केले जाते. व्यवस्थित लसींचा पुरवठा झाल्यास पूर्ण क्षमतेने म्हणजेच ८ लाख लोकांना प्रतिदिन लसीकरण दिले जाईल, असे टोपे यांनी सांगताना केंद्राने त्या तुलनेत लसीचे डोस द्यावेत. राज्याला ५० ते ६० लाख लसीचे डोस आठवड्याला मिळावेत, अशी मागणी असल्याचे टोपे म्हणाले.