मुंबई - कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जनतेने स्वतःचे रक्षक स्वतः बनावे आणि त्यासाठी एक स्वयंशिस्त स्वतःला लावून घ्यावी, असे आग्रही आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.
राज्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 74 पर्यंत गेला आहे. आपण कोरोना संकटाच्या दुसऱ्या स्तरावर आलो आहोत, मात्र जनतेने घाबरून जाण्याचे कारण नाही. बाधित रुग्णाचा हा आकडा वाढू नये म्हणून काळजी घेत आहोत. आकडा वाढला असल्याने राज्यात आम्ही अनेक प्रकारचे निर्णय घेतले असून त्यात सरकारी कार्यालयात केवळ पाच टक्के उपस्थिती राहणार आहे. तसेच आपल्या राज्याच्या अनेक सीमा ही आम्ही सिल करणार आहोत, जे कोरोना बाधित आणि ज्याच्या हातावर शिक्का मारला आहे, असे रुग्ण आता नागरिकांमध्ये फिरणार नाहीत, यासाठी काळजी घेणार आहोत, संबधित रुग्णाला आम्ही त्यांच्या गावापर्यंत पोचवण्याची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली.
राज्यात आपण सर्वांनी संशयित आणि पॉझिटिव्ह रुग्णांचे मनोबल वाढवण्याचे काम केले पाहिजे. या दरम्यान, वाहतूक व्यवस्था ही अत्यावश्यक सुविधासाठी ठेवली जाणार आहे, त्यामुळे या सेवेसाठी जे कर्मचारी असतील त्यांना पास देण्यात येईल, गाडी देण्यात येईल, त्यांना स्टिकर लावण्यात येईल. जनतेला धोका होऊ शकतो त्या बॉर्डरसुद्धा बंद करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी जाऊन गर्दी करू नये, असेही आवाहन टोपे यांनी केले.
पाच व्यक्तिः पेक्षा जास्त लोक जमू नये, हा जमावबंदी आदेश आहे. हा निर्णय लोकांचे आरोग्य आणि जनहित लक्षात ठेवून घेतला आहे. त्यामुळे मी लोकांना एकच विनंती करेन की, लहान मुले आणि वृद्धांची काळजी अधिक घ्यायची आहे. आणखी एका रुग्णाचा मृत्य जरूर झाला आहे. पण, त्यांना हृदयाचे आजार आणि डायबेटिस आदी आजार होते. राज्यात आतापर्यंत कोरोनासाठी 1 हजार 876 रुग्णाची तपासणी केली असून त्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. त्यात 1 हजार 592 निगेटिव्ह असून 210 नमुना चाचण्या बाकी आहेत, त्या ही लवकरच मिळतील. मधल्या काळात कोरोना विषय असल्यामुळे ब्लड डोनेशन कॅम्प झाले नाहीत. पण, ब्लड डोनेशन कॅम्प आपल्याला करायच्या असल्याचे टोपे यांनी सांगितले.