मुंबई - ईडीने आरोपपत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांचे पुत्र आणि पत्नी या दोघांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. परंतु त्यापैकी कोणीही हजर झाले नाही. नवाब मलिक यांच्या पत्नीला दोनदा समन्स पाठवण्यात आले होते. त्यांचा मुलगा फराज मलिकला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 5 वेळा समन्स बजावण्यात आले होते.
मंत्री नवाब मलिक यांना ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटक केल्यानंतर चौकशीदरम्यान नवाब मलिक यांचा जबाब नोंदवण्यात आला. त्यावेळी नवाब मलिक यांनी सांगितले की अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिचा बॉडीगार्ड सलीम पटेलला मी 2002 सालापासून मी ओळखत होतो. तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता आणि राष्ट्रवादीचे तत्कालीन मुंबई अध्यक्ष चंद्रकांत त्रिपाठी यांच्या नेतृत्वात तो काम करत होता अशी कबुली नवाब मलिक यांनी ईडीला दिली आहे.
सलीम पटेल हसीना पारकरचा निकटवर्तीय - गोवावाला कम्पाउंडच्या संबंधित व्यवहारात नवाब मलिक यांचे भाऊ अस्लम मलिक यांचाही महत्वाचा भाग आहे. 2005 साली मलिक यांनी सलीम पटेल विषयी लोकांना विचारलं त्यावेळी त्यांना त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचं सांगण्यात आलं असंही मलिक यांनी म्हटलं आहे. सलीम पटेल हा हसीना पारकरचा अत्यंत जवळचा निकटवर्तीय होता.
हसीना पारकरने केलेल्या जवळपास सर्व व्यवहाराची त्याला कल्पना असायची. गोवावाला कम्पोउंड संदर्भात झालेल्या व्यवहारात सलीम पटेलला नवाब मलिक यांच्याकडून 15 लाख मिळले होते. यातील दुसरा आरोपी सरदार शाहवली खान याला 5 लाख, हसीना पारकरला रोख स्वरूपात 5 लाख आणि चेकमध्ये 5 लाख असे पैसे देण्यात आले होते. हे पैसे नवाब मलिक यांचा मुलगा फराझ मलिक आणि भाऊ अस्लम मलिक यांच्यासमोर देण्यात आले होते अशीही माहिती समोर आली आहे.