मुंबई - राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंह भोसले, वैभव पिचड, संदीप नाईक आणि काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबर यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपविला आहे. तेव्हा त्यांच्यासोबत गिरीश महाजनही उपस्थीत होते. यावेळी माध्यमांसोबत बोलताना महाजन यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची सद्यस्थिती पाहता विधानसभेत त्यांचे 40 आमदारही निवडून येणे शक्य नाही, असा दावा केला आहे.
आमच्याकडे येणारे अनेकजण हे विकास कामांसाठी येत आहेत - महाजन
भाजपात आज अनेक मोठे नेते हे प्रवेश करत आहेत. यामुळे येत्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मिळून ४० आमदारही निवडून येणार नाहीत. काँग्रेसचा तर वरपासून खालपर्यंत अध्यक्ष कोण आहे हे निश्चित नाही. यामुळे आमच्याकडे अनेकजण विकास कामांसाठी येत आहेत. देशात आणि राज्यात भाजपशिवाय भविष्यकाळ नाही, हे कळले असल्याने अनेकजण भाजपात प्रवेश करत आहे, असे महाजन म्हणाले.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील लोकांचा पक्षावरील विश्वास उडाला आहे - महाजन
काँग्रेस आणि राष्ट्रवादीत जे लोक शिल्लक राहिलेलेले आहेत, ते केवळ नामधारी असतील. जिल्हा परिषदेच्या सदस्यांपासून ते नगरसेवक आणि आमदारांपर्यंत या पक्षांमध्ये राहण्यासाठी कोणीही उत्सुक राहिलेले नाही. या पक्षांतील लोकांवरील विश्वास उडालेला असल्याने या दोन्ही पक्षांतील लोक आपले पक्ष सोडून भाजपामध्ये येत आहेत. सध्या आमच्याकडे येणारे या दोन्हीही पक्षातील जवळपास ५० आमदार आहेत. यात अधिकची संख्या वाढू शकते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्यातील आमदार शिवेंद्रसिंह भोसले, अकोलेतील आमदार वैभव पिचड, ऐरोलीचे आमदार संदीप नाईक आणि काँग्रेसचे मुंबईतील आमदार कालिदास कोळंबर यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपविल्यानंतर महाजन यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.