मुंबई - पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाल्यानंतर या प्रकरणी माकपचे महासचिव सीताराम येचुरी, राहुल गांधी यांनी या हत्येमागे आरएसएसचा हात असल्याचा आरोप केला होता. या विरोधात अॅड. धृतिमान जोशी यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी माझगाव न्यायालयाने २५ मार्च रोजी राहुल गांधी व सीताराम येचुरी यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
गौरी लंकेश हत्या प्रकरणी राजकीय वक्तव्य करणे राहुल गांधी व सीताराम येचुरी यांना महागात पडू शकते. पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाल्यानंतर या प्रकरणी सीताराम येचुरी, राहुल गांधी यांनी या हत्याकांडात आरएसएसचा हात असल्याचा आरोप केला होता. राहुल गांधी व सीताराम येचुरी यांच्या या आरोपांच्या विरोधात अॅड. धृतिमान जोशी यांच्याकडून कुर्ला न्यायालयात सप्टेंबर २०१७ मध्ये ही तक्रार दाखल झाली होती.
गौरी लंकेश यांच्या हत्येशी आरएसएसचा संबंध नव्हता मात्र आरएसएस विरोधात मोहीम चालविले जात असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. सुरुवातीला कुर्ला न्यायालयातून ही तक्रार माझगाव कोर्टात गेल्यानंतर माझगाव न्यायालयाने यासंबंधी भायखळा पोलिसांकडे तपास करून अहवाल देण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी योग्य तपास केला नसल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायालयाने दखल घेत येत्या २५ मार्च रोजी माझगाव न्यायालय येथे राहुल गांधी व सीताराम येचुरी यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. राहुल गांधी यांनी केलेले आरोप कितपत खरे आहेत याबद्दलचा खुलासा त्यांना कोर्टात करावा लागेल असे याचिकाकर्ते अॅड. धृतिमान जोशी यांनी म्हटले आहे.