मुंबई - मुंबई अग्निशमन दलाचे माजी प्रमुख अधिकारी शशिकांत काळे यांनी खोटी माहिती देऊन राष्ट्रपती पदक मिळवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी काळे बडतर्फ करण्याचा प्रस्तावाला आज भाजपकडून विरोध (BJP against Kale Proposal) करण्यात आला. तर काँग्रेसने चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला. यामुळे काळे यांना बडतर्फ़ करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर झाला. दरम्यान या प्रस्तावावरून भाजपा विरुद्ध काँग्रेस (BJP v/s Congress Controversy) असा वाद रंगला.
अग्निशमन अधिकारी निलंबित -
मुंबई अग्निशमन दलात उप अग्निशमन अधिकारी या पदावरील शशिकांत काळे यांना मुख्य अग्निशमन अधिकारी या पदाचा पदभार सोपवण्यात आला होता. या कार्यकाळात त्यांनी आपला सेवा अहवाल चांगला करून स्वतःचे नाव राष्ट्रपती पदकासाठी पाठवले होते. हा प्रकार निदर्शनास येताच पालिका आयुक्तांनी चौकशी समिती नेमून काळे यांना निलंबित केले. तसेच त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. याबाबतचा प्रस्ताव आज पालिकेच्या स्थायी समितीत सादर करण्यात आला होता.
बडतर्फीला भाजपचा विरोध -
या प्रस्तावावर बोलताना भाजपचे पक्ष नेते विनोद मिश्रा यांनी चौकशीनंतर काळे यांना निलंबित केले आहे. चौकशीत कुठेही निलंबित करा म्हटले नाही. त्यामुळे तो अहवाल स्थायी सामितीच्या पटलावर ठेवा अशी मागणी केली. तर स्थायी समिती बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांना बडतर्फ करण्याला आमचा विरोध नाही. मात्र या प्रस्तावात काळे हे उप अग्निशमन अधिकारी आहेत, असे लिहिले आहेत. त्याऐवजी ते मुख्य अग्निशमन अधिकारी आहेत असे लिहिले जावे अशी उपसूचना मांडल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
काँग्रेसचा प्रकार विरोध -
खोटी माहिती देऊन शशिकांत काळे यांनी राष्ट्रपती मेडल मिळवण्याचा प्रयत्न केला. असे चुकीचे काम केल्याने काळे यांना पालिका आयुक्तांनी निलंबित केले आहे. आता आयुक्तांनी त्यांना बडतर्फ करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीत पाठवला आहे. त्यामुळे त्यांना का वाचवता, असा प्रश्न भाजपाला विचारत काळे यांना बडतर्फ करावे अशी मागणी काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली. यावर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मदतीने भाजपची उपसूचना नामंजूर करत काळे यांना बडतर्फ करण्याचा प्रस्ताव मंजुरी केला.
हेही वाचा - अग्निशामक दलाचे प्रमुख शशिकांत काळे यांना अखेर पदावरून हटवले