मुंबई - वेदांत फॉक्सकॉनसारखे प्रकल्प महाराष्ट्र बाहेर गेल्याने आक्रमक झालेले माजी मंत्री व शिवसेना नेते आदित्य ठाकरे शिंदे फडणवीस सरकारला कोंडीत पकडण्याची संधी सोडत नाहीत. आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत या दोन प्रकल्पांबाबत विद्यमान सरकारला जाब विचारला. संपूर्ण महाराष्ट्रात त्याची आता चर्चा सुरू झाली. आता आदित्य ठाकरे यांनी नवीन मुद्दा उपस्थित केला आहे. मुंबईत होणाऱ्या सिलिंकचे काम ज्या कंपनीला दिले आहे ती कंपनी मुंबईत मुलाखती न घेता चेन्नईत का घेते? याबाबत सरकारला मुख्यमंत्र्यांना कल्पना आहे का? असा असावा आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
राज्यात सर्व सावळा गोंधळ सुरू - यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, वेदांत फॉक्सकॉनसारखे प्रकल्प जे महाराष्ट्राच्या वाट्याचे होते ते गुजरातला गेले. प्रकल्प कोणत्या राज्यात गेला त्याला आमचा विरोध नाही. आमचा विरोध महाराष्ट्रातला रोजगार दुसऱ्या राज्यात गेला त्याला आहे. आम्ही केलेल्या या विरोधानंतर त्यांनी या कंपन्यांना ट्विट करायला सांगितलं. त्यामुळे या कंपन्यांनी या प्रकल्पापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्रात आम्ही आणू असे जाहीर केले. पण जे आपल्या वाट्याचे होते ते आपल्या मिळाले नाही ही खंत आहे. या प्रकल्पाबाबत आवाज उठवायला सुरुवात केल्यानंतर आता आपले मुख्यमंत्री विविध ठिकाणी भेटी देत आहेत. आपल्या उद्योग मंत्र्यांना तर माहिती देखील नसते की कोणते प्रकल्प सुरू आहेत आणि कुठल्या प्रकल्पाचे काय स्टेटस आहे. हा एकूणच सगळा सावळा गोंधळ सुरू आहे.
मुलाखती मुंबईत न होता चेन्नईला का - पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आपल्याकडे जसा वरळी सिलिंग आहे त्याच धर्तीवर वर्सोवा बांद्रा सिलिंग मागच्या अनेक वर्षांपासून प्रस्तावित आहे. उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते त्या काळात या प्रकल्पाचे काम थोडे पुढे सरकले पण आमच सरकार गेले आणि आलेल्या या नव्या सरकारने या प्रकल्पाचा कॉन्ट्रॅक्टरच बदलला. मी हा मुद्दा यासाठी उपस्थित करतोय कारण आमच्या सरकारच्या काळात एक नियम करण्यात आला होता की महाराष्ट्रात जे काही प्रकल्प येतील त्या प्रकल्पांमध्ये 80 टक्के रोजगार हा तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना देण्यात यावा. आता या सरकारने ज्या कंपनीला या सिलिंगच कंत्राट दिलं या कंपनीने विविध पदांसाठी भरती जाहीर केली. मात्र, त्याच्या मुलाखती मुंबईत न होता चेन्नईला होणार आहेत.
स्थानिक भूमिपुत्रांना 80 टक्के प्राधान्य - आदित्य ठाकरे यांनी आणखी एक मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, माझा या सरकारला प्रश्न आहे जर प्रकल्प मुंबईत आहे तर त्याच्यासाठी ची नोकर भरती ही चेन्नईला का? महाराष्ट्रात देखील अनेक सिविल इंजिनियर आहेत. त्यांना रोजगार कधी मिळणार? मुंबईतल्या प्रकल्पाच्या मुलाखती चेन्नईला होत आहेत याची माहिती मुख्यमंत्र्यांना आहे का? मुख्यमंत्री याच्याबाबत स्पष्टीकरण देणार का? प्रकल्प जर मुंबईत होतोय तर त्याच्यासाठी लागणाऱ्या नोकरभरतीच्या मुलाखती या मुंबई ठाणे, औरंगाबाद अथवा महाराष्ट्रातल्या कोणत्याही ठिकाणी होणं आवश्यक होतं. कारण, आम्ही आणलेल्या नवीन धोरणाप्रमाणे इथल्या 80टक्के भूमिपुत्रांना यात रोजगार मिळणे गरजेचे आहे. माझं मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे त्यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावं.