मुंबई - एका सोने व्यापाऱ्याला कायदेशीर कारवाईत अडकवण्याची धमकी देत 70 लाखांची खंडणी मागणाऱ्या तोतया आयपीएस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने मरिन ड्राइव्ह येथील हॉटेल ट्रायडेंट जवळील परिसरातून त्याला अटक केली आहे.
या प्रकरणातील पीडित व्यापारी हरिसिंग राव यांचे रिया ज्वेलर्स नामक ज्वेलरी शॉप आहे. त्यांच्याकडील दागिने राज्यात तसेच देशभरात विकण्यात येत असल्याने विविध ज्वेलर्स व्यावसायिकांशी त्यांची ओळख आहे. या निमित्ताने हरिसिंग यांची हैदराबाद येथील मसुद्दीलाल ज्वेलर्सच्या मालकाशी ओळख झाली.
जामीन करण्यासाठी एक 'माणूस' आहे...
2016 मध्ये नोटबंदी झाल्यानंतर मसुद्दीलाल ज्वेलर्सचे मालक मोहन लाल गुप्ता यांचा लहान भाऊ कैलास गुप्ताच्या दोन मुलांना अटक झाली होती. संबंधित माहिती हरिसिंग राव यांना देखील होती. या घटनेनंतर काही दिवसांनी हरिसिंग राव यांच्या समाजातील एका व्यक्तीने त्यांना फोन केला. मसुद्दीलाल ज्वेलर्सच्या मालकाच्या मुलांचा जामीन करण्यास काही मदत हवी असल्यास त्यांच्याकडे एक माणूस असल्याचे या व्यक्तीने सांगितले. यावेळी हरीसिंग राव यांनी संबंधित व्यक्तीला कैलास गुप्तांचा क्रमांक देऊन याबाबत संपर्क करण्यास सांगितले.
जामीन करण्यासाठी 5 किलो सोन्याची मागणी...
यानंतर हरिसिंग राव हैदराबादला गेल्यानंतर मोहनलाल गुप्ता यांनी त्यांना माहिती दिली. त्यांच्या समाजातील या कैलास गुप्ता यांच्या मुलांची सर्वोच्च न्यायालयातून जामिनावर सुटका करण्यासाठी पैसे मागितले आहेत. परंतु, नोट बंदीमुळे पैसे नसल्याने त्यांना पाच किलो सोने द्यावे लागणार असल्याचे या व्यक्तीने सांगितले. त्यावर हरिसिंग यांनी याबाबत तुम्ही निर्णय घ्या, असे सांगितले.
हैदराबाद येथून परत आल्यानंतर काही दिवसांनी मोहनलाल गुप्ता यांनी हरिसिंग राव यांना फोन करून त्यांचे काम झाले नसल्याने तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला दिलेले पाच किलो सोने परत करण्याची मागणी केली. त्यावर हरिसिंग राव यांनी संबंधित व्यक्ती परिचयाचा नसल्याचे उत्तर दिले.
पाच किलो सोने पचवल्यानंतर 2019 मध्ये प्रकरणाला नवीन वळण...
2019 मध्ये नोव्हेंबर महिन्यात एका व्यक्तीने हरिसिंग यांना पुन्हा संपर्क करून मध्यस्ती करणारी व्यक्ती भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी असल्याचे सांगितले. त्याचे नाव अनिल कुमार मीना असल्याची माहिती देऊन गुप्ता परिवार देखील त्यांच्या परिचयाचे असल्याचे त्यांनी म्हटले. गुप्ता परिवाराने दिलेले पाच किलो सोने परत न केल्यास इंटेलिजन्स विभागाकडून कारवाई करण्यात येईल, अशी धमकी या तोतया आयपीएस अधिकाऱ्याने दिली. त्यानंतर काही दिवस तो वारंवार फोन करून हरिसिंग राव यांना कारवाई करण्याची धमकी देत होता.
'माझी' चूक नसताना दीड कोटी.. ?
संबंधित प्रकरण मिटवण्यासाठी दीड कोटी रुपये देण्याची मागणी आरोपीने हरिसिंग राव यांच्याकडे केली. या प्रकरणापासून पाठ सोडवण्यासाठी हरिसिंग यांनी 70 लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली. मात्र, या प्रकरणात आपला काहीही संबंध नसताना मोठ्या रकमेची मागणी झाल्याने हरिसिंग यांनी गुन्हे शाखेकडे धाव घेतली. प्राथमिक पडताळणीनंतर पैशांच्या मागणी करणारा आरोपी तोतया आयपीएस अधिकारी असल्याचे लक्षात आले. तसेच त्याचे नाव संतोष मिसाळ असल्याचेही तपासात समोर आले.
यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपी संतोष मिसाळला 70 लाखांची खंडणी स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या आरोपीकडून आयपीएस तसेच सीबीआय अधिकारी असल्याचे ओळखपत्र जप्त करण्यात आले आहे. तसेच एका मंत्र्याचा स्वीय-साहाय्यक असल्याचे ओळखपत्र देखील जप्त करण्यात आले आहे.
हैदराबाद येथील व्यापारी मोहनलाल गुप्ता यांचा तोतया आयपीएस अधिकारी संतोष मिसाळ सोबत काय संबंध आहे, तसेच 5 किलो सोने घेणाऱ्या आरोपीचा तपास पोलीस करत आहेत.