मुंबई - कोविडच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग झपाट्याने फैलावत आहे. २० ते ४५ वयोगटातील व्यक्तींना कोरोनाची सर्वाधिक प्रमाणात लागण होत आहे. या पार्श्वभूमीवर १८ वर्षांवरील सर्वांचे कोरोना लसीकरण करण्यात यावे, लसीकरणाची अट शिथील करण्यासाठी राज्याने केंद्राकडे पाठपुरावा करावा अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
लसीकरणाचा वेग वाढला पाहिजे
कोरोनाचा बदललेला विषाणू घातक असून, संक्रमणाचा वेगही अधिक आहे. फेब्रुवारीपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली, तेव्हापासून २० ते ४५ वयोगटातील लोकांना कोरोना होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. नोकरी, कामानिमित्त या वयोगटातील लोक घराबाहेर पडत असतात. त्यांना कोरोनाची लागण झाल्यास घरातील वृद्ध माणसांना देखील कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असतो, त्यामुळे आता 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करणे गरजेचे झाले आहे. ज्या वेगाने कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे, त्याच्यापेक्षा अधिक वेगाने लसीकरणाची आवश्यकता आहे. त्यामुळे लसीकरणाची अट शिथील झाली पाहिजे, त्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करावा अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळावेत
राज्यात कोरोना लसीकरणाची नितांत गरज असताना, केंद्र सरकार मात्र लसीचा अत्यल्प पुरवठा करत आहे. याउलट पाकिस्तानसह इतर देशांना मोफत लस पुरवली जात आहे. राज्यातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी पुरेशा प्रमाणात लस पुरवठा करावा, अशी मागणी पटोले यांनी केली आहे. तसेच जनतेने देखील कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
लसीकरणाच्या योग्य नियोजनाची आवश्यकता
देशात महामारी ही काही पहिल्यांदा आलेली नाही. काँग्रेसचे सरकार असताना महामारींचा सामना करावा लागला होता. तत्कालीन काँग्रेस सरकारने योग्य नियोजन करुन त्यावर यशस्वी मात केली. पोलिओ लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात राबविली, बस स्टँट, रेल्वे स्टेशन, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवल्याने त्यावर मात करणे शक्य झाले. त्याचप्रमाणे कोरोना लसीकरणाचे देखील योग्य नियोजन व्हावे असे पटोले यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - राज्यात टाळेबंदी लावणार नाही, निर्बंध आणखी कडक केले जातील - वडेट्टीवार