मुंबई - दरवर्षीं मुंबईत २ हजार ४९९ मि.मी पाऊस पडतो. मुंबईमध्ये यंदा ९ जूनपासून पावसाला सुरुवात झाली. तेव्हापासून आतापर्यंत पाच ते सहा वेळा मोठा पाऊस पडला. यामुळे सरासरी ५७.८५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. मुंबई शहरात ५८.५४ टक्के, तर उपनगरात ५५.३५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये सरासरी ५७.८५ टक्के पावसाची नोंद असली तरी पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये २८.६८ टक्केच पाणीसाठा आहे. धरणांमध्ये पाणीसाठा कमी असल्याने मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट कायम आहे.
हेही वाचा - ...हे मुंबईसाठी भविष्यातील धोक्याचे इशारे तर नाही ना? - आशिष शेलार
आतापर्यंत ५७.८५ टक्के पावसाची नोंद
मुंबईत जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीत सरासरी २ हजार ४९९ मिलीमीटर पाऊस पडतो. महापालिकेच्या पाऊस मोजण्याच्या यंत्रावर ९ जूनपासून आज (१९ जुलै) सकाळपर्यंत शहर विभागात १ हजार ३४३.३९ मि.मी म्हणजेच ५८.५४ टक्के, पूर्व उपनगरात १ हजार ५६५.५३ मि.मी, तर पश्चिम उपनगरात १ हजार ४२७.९९ मि.मी म्हणजेच उपनगरात ५५.३५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत गेल्या महिनाभरात शहर आणि उपनगरात ५७.८५ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
हवामान खात्याकडे ६१ टक्के पावसाची नोंद -
मुंबईत कुलाबा येथे वर्षभरात २ हजार २९५ मि.मी पाऊस पडतो. भारतीय हवामान विभागाच्या कुलाबा येथील वेधशाळेत आतापर्यंत १ हजार ३२२.२ मि.मी म्हणजेच ५७.६२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. तसेच, सांताक्रूझ येथे वर्षभरात २ हजार ७०४ मि.मी पावसाची नोंद होते. भारतीय हवामान विभागाच्या सांताक्रूझ येथील वेधशाळेत १ हजार ८८१.४ मि.मी म्हणजेच ६९.५८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी कुलाबा येथे ६१.६०, तर सांताक्रूझ येथे ६१.३१ टक्के पावसाची नोंद झाली होती.
धरणात २८.६८ टक्के पाणीसाठा -
मुंबईला सात तलाव आणि धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. मुंबईला वर्षभरासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी असणे आवश्यक असते. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात तलावांतून दररोज ३ हजार ८०० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. पावसाळा संपल्यानंतर १ ऑक्टोबरला तलावांतील उपलब्ध पाण्याचा आढावा घेतला जातो. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी सगळ्यात छोट्या असलेल्या तुळशी आणि विहार तलावाचा अपवाद वगळता अन्य तलावातील पाणी साठा कमी आहे. सध्या सातही तलावांमध्ये मिळून ४ लाख १५ हजार ४७५ दशलक्ष लीटर एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा एकूण लागणाऱ्या पाणीसाठ्याच्या २८.६८ टक्के इतका आहे. मुंबईची धरणे भरण्यासाठी आणखी १० लाख दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची आवश्यकता आहे. यामुळे मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट आहे.
तर पाणीकपातीचा निर्णय -
येत्या काही दिवसांत दमदार पाऊस पडला नाही तर मुंबईत पिण्याच्या पाण्याची समस्या कठीण होऊ शकते. पालिका दरवर्षी ३० जुलैपर्यंत पुरेसा पाणीसाठा आणि येत्या काळातील पावसाचा अंदाज घेऊन कपातीचा निर्णय घेते. हवामान विभागाने पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याची वाट पाहू, समाधानकारक पाऊस न आल्यास कपातीचा निर्णय घ्यायचा की आणखी काही दिवस वाट पाहायची याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पालिकेच्या जल अभियंता विभागाकडून देण्यात आली.
धरण, तलावांमधील पाण्याची स्थिती (१९ जुलै २०२१) -
मोडक सागर - ६६,०९२ दशलक्ष लिटर
तानसा - ७८,४६७ दशलक्ष लिटर
मध्य वैतरणा - ३७,५५१ दशलक्ष लिटर
भातसा - १,९७,३२१ दशलक्ष लिटर
विहार - २७,६९८ दशलक्ष लिटर
तुळशी - ८,०४६ दशलक्ष लिटर
एकूण - ४,१५,१७५ दशलक्ष लिटर
गेल्या तीन वर्षांतील पाणीसाठा -
२०२१ - ४ लाख १५ हजार १७५ दशलक्ष लिटर
२०२० - ३ लाख ९१ हजार २९० दशलक्ष लिटर
२०१९ - ७ लाख ४३ हजार ५३१ दशलक्ष लिटर
हेही वाचा - बकऱ्यांच्या बेकायदा कत्तलखान्यासह वाहतुकीला 'पेटा'चा विरोध