मुंबई - राष्ट्रवादीचा कार्यकर्ता खांद्यावर झेंडा घेवून सर्वसामान्य लोकांचे काम करतोय त्यात आता नाथाभाऊंची भर पडली आहे. आमची बैठक झाली. त्यांनी पक्षात येताना एकही अपेक्षा व्यक्त केली नाही. पक्षात येऊन कष्ट करण्याची भूमिका नाथाभाऊंनी व्यक्त केली आहे. वाहिन्यांवर अनेक बातम्या येत आहेत परंतु मंत्रिमंडळात काहीही बदल होणार नाहीत, जे आहे तसेच राहणार आहे. सर्व प्रदेशाध्यक्ष जयंतरावांच्या नेतृत्वाखाली काम करतील असा विश्वास शरद पवार यांनी आज व्यक्त केला.
भाजप नेते एकनाथ खडसे यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. आज आनंदाचा दिवस आहे. नवीन पिढी पक्षात सहभागी होत आहे. प्रत्येक कार्यकर्ता काम करतोय. परंतु आम्हाला धुळे, जळगाव, नंदुरबार येथे अधिक काम करायचे आहे. पक्षात अजून गती यायची असेल तर नाथाभाऊंची गरज आहे, असे सांगतानाच खानदेश हा गांधी, नेहरू यांच्या विचाराने वाढलेला आहे. कॉंग्रेसच्या विचाराचा हा खानदेश आहे. पक्षावर आणि विचारांवर निष्ठा असलेले लोक घराघरात आहेत. याशिवाय आलेल्या पाहुण्यांना आदराने खादीचा टॉवेल देणारा आणि खादीवर प्रेम करणारे जुनेजाणते लोक या जिल्ह्यात होते याची आठवण शरद पवार यांनी केली.
अनेक नेत्यांनी आपलं आयुष्य या जिल्ह्यासाठी दिले आहे. एका निष्ठेने काम करणारा हा जिल्हा मध्यंतरी असा एक काळ आला तिथे नवी पिढी उदयाला आली ती पिढी उभी करण्याचे काम नाथाभाऊने केले. आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यात हा जिल्हा तयार झाला आणि आता दुसरा टप्पा सुरू होतोय हा जिल्हा राष्ट्रवादी विचाराने चालणारा असेल असे नाथाभाऊंनी सांगितले आहे. हा जाहीर शब्द नाथाभाऊंनी दिला आहे. दिलेला शब्द ते पाळतात असेही शरद पवार म्हणाले.
मध्यंतरी मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आजच सरकारच्यावतीने शेतकर्यांना १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांची जमीन खरवडून गेली आहे. त्याची देखभाल करावी लागणार आहे. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी मजबुतीने राहील, असा विश्वास शरद पवार यांनी शेतकऱ्यांना दिला.
टिव्ही चॅनेलवर सध्या एकच चर्चा सुरू आहे. नाथाभाऊंच्या प्रवेशाची. वेळप्रसंगी जनतेशी बांधिलकी असणारे हे नेते आहेत. लोकांमध्ये जावून काम करतात. त्यामुळे त्यांना संकटाना सामोरे जावे लागते. लोकांच्यामध्ये आहोत म्हणून संकट येत आहेत, असेही शरद पवार म्हणाले.