मुंबई - अंमलबजावणी संचालनालय 'ईडी' ने शिवसेना नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना पुन्हा नव्याने समन्स बजावले आहे. नव्या नोटीसीनुसार वर्षा राऊत ५ जानेवारी रोजी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येणार आहे.
५ जानेवारीला ईडीसमोर चौकशीचा सामना -
वर्षा राऊत यांना ईडीने यापूर्वी समन्स बजावले होते आणि २९ डिसेंबर रोजी म्हणजे आज (मंगळवार) चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, राऊत यांनी ईडीकडे थोडा वेळ मागितला होता. त्यांची ही विनंती मान्य करत ईडीने पुन्हा नव्याने समन्स पाठवले आहे. आता त्यांना ५ जानेवारीला ईडीसमोर चौकशीचा सामना करावा लागणार आहे.
४३०० कोटींचा पीएमसी बँक घोटाळा -
4300 कोटी रुपयांच्या पीएमसी बँकेच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी हजर होण्यासाठी नवे समन्स बजावले असल्याचे ईडीच्या सुत्रांनी माहिती दिली.
भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यानंतर शिवसेना नेते खा. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावले होते. पीएमसी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना २९ डिसेंबरला चौकशीसाठी पाचारण करण्यात आले होते. तर खडसेंना ३० डिसेंबर रोजी बोलावले होते.
ईडीच्या नोटिसीनंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत भाजप ईडीचा वापर सूडबुद्धीने करत असल्याचा आरोप केला होता. दुसरीकडे भाजप नेत्यांनी ईडी कारवाईचे समर्थन केले होते.