मुंबई - मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. ही रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर नाईलाजाने लॉकडाऊन करावे लागेल अशी भीती राज्य सरकारने व्यक्त केली आहे. नागरिकांनी आपली काळजी योग्य प्रकारे घेतली नाही, तर मात्र राज्य सरकार आणि महापालिकेला लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.
मुंबईत मार्चपासून सुरू झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव अकरा महिन्यानंतर काही प्रमाणात कमी झाला होता. मात्र नागरिकांकडून कोरोनाचे नियम पाळले जात नसल्याने मुंबईत पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर महापौर बोलत होत्या, यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, मुंबईकरांना हेच सांगणे आहे, आपल्याला लॉकडाऊन नको आहे. पण गेल्या काही दिवसांमध्ये रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे नाईलाजाने लॉकडाऊनचा करावा लागेल अशी भीती सरकारने व्यक्त केली आहे. ट्रेनमध्ये आणि बसमध्ये गर्दी वाढली आहे. यामुळे ही भीती खरी होऊ शकते. त्यासाठी नागरिकांनी मास्क घालणे, सॅनिटायझरचा वापर करणे आणि सुरक्षित अंतर राखणे या नियमांची योग्य प्रकारे अंमलबजावणी केली पाहिजे. नियमांची अंमलबजावणी केली जात नसल्याने, आपण पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने जात आहोत. असेच रुग्ण वाढत राहिले तर मात्र लॉकडाऊन करावा लागेल.
मुंबईत कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ
मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेली. मात्र सराकारने केलेल्या उपाययोजनांमुळे हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत होता. पण पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. 1 फेब्रुवारीला सर्वात कमी म्हणजेच 328 रुग्ण आढळून आले. तर रविवारी 14 फेब्रुवारीला यात दुप्पट वाढ होऊन 645 रुग्ण आढळून आले. काल सोमवारी 15 फेब्रुवारीला पुन्हा 493 रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईतील गर्दी आणि लोकल ट्रेन सुरू केल्याने होणारी गर्दी, नागरिकांकडून नियमांचे पालन केले जात नसल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचे समोर आले आहे.