मुंबई - मुंबई क्रिकेट असोसिएशन कार्यकारिणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बुधवार (19 ऑक्टोबर)रोजी वानखेडे स्टेडियमवर महाराष्ट्रातील तीन बड्या नेत्यांकडून एकत्रित डिनर डिप्लोमसीचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे यासाठी उपस्थित राहणार आहेत. सत्तांतरानंतर पहिल्यांदाच हे तिन्ही नेते एकत्र येणार असल्याने सर्वांचे लक्ष या डिनर डिप्लोमसीकडे लागले आहे.
एमसीए कार्यकारणीची उद्या निवडणूक - उद्या २० तारखेला एमसीए (मुंबई क्रिकेट असोसिएशन) कार्यकारिणीची निवडणूक होणार आहे. याचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून, याच पार्श्वभूमीवर आज शिंदे, पवार, फडणवीस यांची डिनर डिप्लोमसी आहे. राज्यात झालेल्या नाट्यमय सत्तांतरानंतर महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे-फडवणी सरकार अस्तित्वात आले. यानंतर सर्व प्रमुख पक्षांमधील कटूता मोठ्या प्रमाणामध्ये जरी वाढली असली, तरी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीच्या निमित्ताने ही सर्व मंडळी एकत्र येताना दिसत आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांचा अर्ज मागे घेऊन देवेंद्र फडवणीस यांनी एमसीए निवडणुकीत शरद पवारांच्या साथीने राजकीय खेळी खेळल्याचे ही बोलले जात आहे.
अमोल काळे विरुद्ध संदीप पाटील - एमसीएच्या अध्यक्षपदासाठी अमोल काळे आणि संदीप पाटील यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. अमोल काळे हे पवार-शेलार गटाचे उमेदवार असून देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले आहेत. तर संदीप पाटील हे मुंबई क्रिकेट या गटाचे उमेदवार आहेत. शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, बहुजन विकास आघाडीचे अजिंक्य नाईक यांचाही यामध्ये समावेश आहे. आशिष शेलारसुद्धा याप्रसंगी उपस्थित राहणार असून दोन्ही गटांकडून जोरदार प्रचार सुरू आहे.