मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ( ST Worker Attack On Sharad Pawar House ) घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला हल्ला का झाला, तसेच पोलीस किंवा तपास यंत्रणेमध्ये कोणत्या त्रुटी राहिल्या हे शोधण्याचे काम गृहखात्याकडून सुरू ( State Home Ministry Investigetting Silver Oak Attack ) असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Dilip Walse Patil On Silver Oak Attack ) यांनी दिली आहे. तसेच या प्रकरणात जे पोलीस अधिकारी जबाबदार असतील. त्या अधिकाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
गृहमंत्रालयाकडून तपास सुरू - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतली. या भेटीमध्ये घडलेल्या प्रकाराबाबत घटनेला नेमकं कोण जबाबदार आहे? याबाबत चर्चा झाली. कोणत्या त्रुटी राहिल्यामुळे ही घटना घडली याबाबतची सर्व चौकशी केली जाणार असून लवकरच या घटनेबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे. कायदा सुव्यवस्था बिघडण्यासाठी जे जबाबदार असतील त्या, सर्वांवर कारवाई केली जाणार आहे. काही एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करण्याआधी शरद पवार यांच्या घराच्या परिसराची रेकी केली. तसेच आंदोलन करता वेळी काही एसटी कर्मचाऱ्यांनी मद्य प्राशन केलं होतं का? याबाबत देखील पोलिसांकडून तपास सुरू सुरू असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.
एसटी कर्मचाऱ्यांनी शांतता ठेवावी - एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना कोर्टात आणल्यानंतर काही एसटी कर्मचाऱ्यांनी तेथे गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोंधळ घालण्याचा कोणताही प्रयत्न एसटी कर्मचाऱ्यांनी करू नये. कायदा व सुव्यवस्था राखण्याची काळजी एसटी कर्मचाऱ्यांनी घ्यावी, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले. एसटी कर्मचाऱ्यांच्या बहुतेक मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या. उच्च न्यायालयानेदेखील याबाबत आपला निकाल दिला. त्यामुळे कोणाच्याही प्रक्षोभक वक्तव्यांना आहारी जाऊन टोकाची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेऊ नये, असा सल्ला गृहमंत्र्यांनी दिला.
'सदावर्तेंच्या आरोपांत कोणतेही तथ्य नाही' - पोलिसांनी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक केल्यानंतर आपली हत्या होणार असल्याचे सदावर्ते यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. मात्र, गुणरत्न सदावर्ते यांच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. अशा प्रकारचे आरोप करणे आणि तक्रारी करण्याची सवय सदवर्ते यांना असल्याचे म्हणत त्यांचे आरोप गृहमंत्र्यांनी फेटाळून लावले आहेत.
शरद पवार यांची सुरक्षा वाढवली - शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा वाढवण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्र्यांकडून देण्यात आली. मात्र, शरद पवार यांनी कोणताही दौरा रद्द केला नसून, उद्या त्यांच्या नियोजित दौऱ्यावर जाणार असल्याचेही गृहमंत्र्यांनी सांगितले.
हेही वाचा - Accident on Pune-Mumbai Highway : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कारची ट्रकला धडक; अपघातात चार जणांचा मृत्यू