मुंबई - एमबीबीएस झालेल्या प्रत्येक डॉक्टरची एमडी होण्याची इच्छा असते. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या डॉक्टरला एखाद्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवावा लागतो. मात्र, हा प्रवेश काही सहजा सहजी मिळत नाही. त्यासाठी लाखो रुपये भरावे लागतात. असाच प्रकार मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात उघडकीस आला आहे. एमडी होण्यासाठी प्रवेश मिळवून देण्यासाठी ५० लाख रुपयांची मागणी करणाऱ्या डेप्युटी डीनला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
गुन्हा दाखल..
मिळालेल्या माहितीनुसार अलिशा अब्दुल्ला शेख (वय २८) ही युवती पेशाने डॉक्टर आहे. ती मध्यप्रदेश येथील राहणारी आहे. तिला सायन रुग्णालयातील वैद्यकीय महाविद्यालयात एमडीचे एडमिशन मिळवून देण्यासाठी सायन रुग्णालय मेडिकल कॉलेजचे डेप्युटी डीन राकेश रामनारायण वर्मा (वय ५४) यांनी ५० लाख रुपयांची मागणी केली होती. वर्मा यांनी अलिशाचे वडिल अब्दुल्ला शेख यांच्याकडून आपल्या कॉर्पोरेशन बँकेच्या खात्यामध्ये २१ लाख १० हजार रुपये मागवून घेतले होते. याबाबत सायन पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान ४२० कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉक्टर अटकेत, चौकशी सुरू..
सायन पोलिसांनी वर्मा यांना पालिकेच्या नायर रुग्णालयातील डॉक्टर्स क्वार्टर्स येथून ताब्यात घेतले आहे. वर्मा यांनी एडमिशन मिळवून देण्याच्या बदल्यात ५० लाख रुपये घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे पोलिसांनी वर्मा यांना काल बुधवारी अटक केली आहे. वर्मा यांची पोलीस चौकशी करत असून आणखीही काही विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा : एल्गार परिषेदच्या आयोजनाला पुणे पोलिसांनी नाकारली परवानगी; बी. जी. कोळसे पाटलांनी केला होता अर्ज