मुंबई - सचिन वाझे प्रकरणामध्ये कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, जो कोणी यात दोषी असेल त्या अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिला. चौकशी करण्याआधी मात्र कोणालाही दोषी ठरवले जाऊ नये, असे ते यावेळी म्हणाले. वाझे यांच्यावर गृह खात्याकडून कारवाई करण्यात आली असून त्यांचे तत्काळ निलंबनही करण्यात आले आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले.
हेही वाचा - ख्वाजा युनूस ते रेखा जरे प्रकरणाचा 'घाट'; जातेगाव घाटाशी सचिन वझेचांही संबंध
'राष्ट्रपती राजवटीचा मुद्दाच नाही'
वाझे प्रकरणानंतर पुन्हा एकदा विरोधकांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी, अशाप्रकारची मागणी करण्यास सुरुवात केली आहे. भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी अशाप्रकारचे पत्र केंद्र सरकारला लिहिले आहे. मात्र अशी मागणी करणे चुकीचे आहे. मनसुख हिरेन यांच्या हत्येबाबत एटीएस चौकशी करीत आहे. तर स्कॉर्पिओ कारमध्ये ठेवण्यात आलेल्या जिलेटिनच्या कांड्या प्रकरणामध्ये एनआयए तपास करीत आहे. तपासाअंती जे सत्य आहे, ते समोर येईलच. म्हणून राष्ट्रपती राजवटीची मागणी करणे चुकीचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - मी क्राईम ब्रांचमधून मुक्त झालो - सचिन वझे
गृहमंत्र्यांच्या भूमिकेसंदर्भात चर्चा नाही
पोलीस आयुक्त किंवा गृहमंत्री बदलीबाबत कोणतीही चर्चा नाही. आज मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत राज्याच्या प्रश्नांवर चर्चा झाली. मात्र मनसुख हिरेन हत्या प्रकरणामध्ये एटीएस चौकशी करत आहे, लवकरच सत्य बाहेर येईल. या प्रकरणात गृहमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेच्या संदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही, अशी माहिती त्यांनी दिली. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग हेदेखील आपले काम व्यवस्थित करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या बदलीसंदर्भात कोणतीही चर्चा बैठकीत झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.