मुंबई - मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढू लागताच पालिका ऍक्शन मोडमध्ये आली आहे. लग्न कार्यालये, पब, हॉटेल, रेस्टोरंटवर धाडी टाकण्यास सुरुवात केली आहे. या अनुषंगाने वाकोला येथील लग्नाच्या ३ हॉलवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पालिकेच्या आरोग्य विभागाने वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
धाडी सुरू -
मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत 1 फेब्रुवारीपासून लोकल ट्रेन सुरू होताच गर्दी वाढली आहे. इतर ठिकाणीही नागरिक मास्कचा वापर करत नसल्याने कोरोना रुग्णांचा संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबईत दररोज 300 रुग्ण आढळून येत होते त्यात वाढ होऊन रुग्णांचा आकडा एक हजारच्या वर गेला आहे. असेच रुग्ण आढळून आल्यास मुंबईत पुन्हा लॉकडाऊन लागू नये, म्हणून पालिकेने ऍक्शन प्लान तयार केला आहे. त्यानुसार कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लग्न कार्यालये, पब, हॉटेल, रेस्टोरंटवर धाडी टाकण्यास सुरुवात केली आहे. तसेच जे नागरिक गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करत नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत आहे.
लग्नात गर्दी गुन्हा दाखल -
मुंबई महापालिकेच्या एच वेस्ट या विभागाच्या हद्दीत वाकोला सीएसटी रोड येथील युशोधन मॅरेज हॉल, गुरूनानक मॅरेज हॉल तसेच नूर मॅरेज हॉल यामध्ये २०० ते ३०० लोक हजर होते. त्याठिकाणी कोणत्याही प्रकारची सोशल डिस्टनसिंग नव्हती. लोकांनी मास्क घातले नव्हते. कोरोना नियमांची पायमल्ली केल्याने या तिनही हॉलवर वाकोला पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
हेही वाचा- रुग्णसंख्या कमी होत नसल्याने अमरावतीमधील लॉकडाऊन आठ दिवसांनी वाढवला