मुंबई - राज्य सरकारने कोळी वस्त्यांना गावठाण म्हणून जाहीर केले आणि सीमांकनचा निर्णय घेतला. परंतु दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या सुधाकर शेट्टी व त्यांचे सहकारी शेठ बिल्डर्स हे सर्व नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीरपणे गावठाण परिसरात बांधकाम करत आहेत असा आरोप एडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी आज राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन या प्रकरणाची लोकायुक्त व ईडीमार्फत चौकशी करण्यात यावी असे निवेदन दिले आहे.
सर्रासपणे कायद्याचे उल्लंघन!
आगरी, कोळी, भंडारी या समाजातील ज्या वस्त्या मुंबई आणि उपनगरात आहे. त्यावर बिल्डरांचा डोळा असून ती संस्कृती नेस्तनाबूत करून त्यांना बेरोजगार करून सत्तेतील राजकारणी मात्र पैसे कमावत आहेत, असा आरोप एडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. एका बाजूला संसदीय कामकाज मंत्री अनिल परब पत्र देतात की कोणत्याही परिस्थितीत सायन कोळीवाडा गावठाण जमिनीवर कोळी वस्तीला तोडून दिले जाणार नाही. त्याच प्रकारे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे देखील या कोळी बांधवांना आश्वासन देतात आणि त्यांच्या कार्यालयातील मिटकरी अधिकाऱ्यांना सांगतात कोणत्याही प्रकारे तोडफोड केली जाणार नाही. परंतु दुसरीकडे यांचेच आदेश धाब्यावर बसवत हे मंत्री लोकांची दिशाभूल करत आहेत असे सदावर्ते म्हणाले.
पुर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी!
कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करत कायदेशीरदृष्ट्या ची प्रकरणच महानगरपालिकेच्या अखत्यारीत येत नाहीत. तरीदेखील भ्रष्टाचारा समोर कायद्याला धाब्यावर बसवले जात आहे. तेव्हा सदर सरकार विरुद्ध कारवाई होणे अपेक्षित आहे. राज्य सरकारने कोळीवाड्यांना स्पष्टपणे गावठाण असे नमूद केले आहे व सीमांकान करण्याचा निर्णय घेतला आहे. तर मग मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय सुधाकर शेट्टी आणि शेठ बिल्डर कसं काय पोलिसांना, पालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून गावठाणे, किल्ले नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करून हजारो करोडचा भ्रष्टाचार करत आहेत, अस प्रश्नही सदावर्ते यांनी उपस्थित केला आहे. या पूर्ण प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे. हजारो करोडचा जमीन व्यवहार करून त्यावर नफा कमवून बेकायदेशीरपणे ही बाब उघड्या डोळ्याने होत आहे. तेव्हा या सर्व भ्रष्टाचार प्रकरणी संसदीय कामकाज मंत्री अनिल परब, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मुख्यमंत्री यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांची लोकायुक्त महाराष्ट्र आणि ईडी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी सदावर्ते यांनी केली आहे.