मुंबई - राज्यात आज ५ हजार ९८४ कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून १५,०६९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज जितके रुग्ण नव्याने आढळून आले त्याच्या तिप्पट रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सर्वात कमी रुग्ण निदान होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे राज्यातील कोरोनाचा प्रसार नियंत्रणात येत असल्याचे समोर येत आहे.
राज्यात आज १५ हजार ६९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे कोरोनावर मात करून बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा १३ लाख ८४ हजार ८७९ वर पोहचला आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.४८ टक्क्यांवर पोहोचले आहे. आजही नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त नोंदवली गेली आहे. दिवसभरात ५ हजार ९८४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या देखील कमी होऊन १ लाख ७३ हजार ७५९ एवढी कमी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८१ लाख ८५ हजार ७७८ नमुन्यांपैकी १६ लाख ०१ हजार ३६५ नमुने पॉझिटिव्ह (१९.५६ टक्के) आले आहेत. राज्यात २४ लाख १४ हजार ५७७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २३ लाख २८५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १२५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून एकूण ४२ हजार २४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.
हेही वाचा - 'साहेब एवढ्यात काय होणार?'...नुकसान भरपाई मिळालेल्या शेतकऱ्यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल