मुंबई - वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. यानंतर हाताला काम आणि पोटाला भाकरी नसल्याने गावी गेलेले मुंबईतील परप्रांतीय मजूर आता पुन्हा मोठ्या संख्येने मुंबईत परतू लागले आहेत. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे मोठ्या प्रमाणे परप्रांतीय मजूर गेल्या काही दिवसांपासून मुंबईत दाखल होत आहेत. मात्र, या गाड्यांमधून कोरोना पॉझिटिव्ह प्रवासी येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या २३ दिवसात बाहेरच्या राज्यातून लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांमधून मुंबई दाखल होणाऱ्या 1 लाख 29 हजार 61 रेल्वे प्रवाशांची तपासणी केली असता, सुमारे 553 कोरोना पॉझिटिव्ह प्रवासी आढळून आले आहेत.
हेही वाचा - ऐन महामारीत खाद्यतेलासह एलपीजीच्या महागाईचा 'भडका'; दोन वर्षात किमती दुप्पट
1 लाख 29 हजार 61 प्रवाशांची तपासणी-
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून अनेक राज्य सरकारने आपल्या राज्यात येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल अनिवार्य केला आहे. तसेच ज्या प्रवाशांकडे कोविड चाचणीचा अहवाल नाहीत अशा प्रवाशांची कोविड चाचणी रेल्वे स्थानकांवर करण्यांत येणार आहे. महाराष्ट्र्रातसुद्धा खबरदारी म्हणून बाहेर राज्यातून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची कोविड तपासणी करण्यात येत आहे. मुंबई विभागातील सीएसएमटी, दादर, एलटीटी, पनवेल, मुंबई सेंट्रल, वांद्रे, कल्याण, ठाणे, बोरीवली या स्थानकावर थांबणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याच्या सूचना रेल्वे पोलिसांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार रेल्वे सुरक्षा बलाच्या मदतीने रेल्वे स्थानकात प्रवाशांची कोरोना तपासणी करण्यात येत आहे. 17 एप्रिल ते 10 मेपर्यंत लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून 1 लाख 29 हजार 61 प्रवाशांची तपासणी केली असता, सुमारे 553 कोरोना पॉझिटिव्ह प्रवासी आढळून आले आहेत. त्यांना विलगीकरण कक्षात दाखल केले आहे.
८ राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी -
वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र शासनाने खबरदारी म्हणून उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, राजस्थान, गोवा, गुजरात, केरळ आणि दिल्ली या आठ राज्यातून मुंबईत येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल अनिवार्य केला आहे. प्रवाशांना रेल्वेत बसण्याच्या ७२ तासांच्या आधी आरटीपीसीआर चाचणी करून त्याचा अहवाल सोबत आणणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक रेल्वे प्रवासी आरटीपीसीआर चाचणी अहवाल आणत नाही. परिणामी, त्यांची थर्मल तपासणी केली जाते. यात प्राथमिक लक्षणे आढळून आल्यास अँटीजेन चाचणी केली जाते. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णालयात दाखल करून आरटीपीसीआर चाचणी केली जाते. यावेळी कोरोनाबाबतची खात्री करून विलगीकरणात ठेवण्यात येते. या तपासणी अहवालाची माहिती महापालिका, नगरपालिका यांच्या पथकाकडून करण्यात येत आहेत, अशी माहिती लोहमार्ग पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे.
मुंबईकरांची डोकेदुखी वाढणार-
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी मुंबईसह राज्यभरात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आलेला होता. आता मुंबईतील कोरोना रुग्ण संख्या नियंत्रणात येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजूरसुद्धा आता मुंबईत परतू लागले आहेत. ही संख्या दररोज वाढत जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. मुंबई 17 एप्रिल ते 10 मेपर्यंत 1 लाख 29 हजार 61 प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील ५५३ प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीतून निष्पन्न झाल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली आहे. मात्र गेला काही दिवसांपासून बाहेर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या बघता, कडक नियमासह कोरोना चाचणी अनिर्वाय करणे गरजेचे आहे. ज्या प्रवाशांकडे आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल नाहीत त्या प्रवाशांना रेल्वे गाडीत प्रवेश देऊन नयेत, अन्यथा मुंबईत कोरोना पुन्हा एकदा हातपाय पसरू शकते अशी शक्यता प्रवासी संघटनेकडून वर्तविण्यात येत आहे.
हेही वाचा - 'तारक मेहता...'मधील 'टप्पू'च्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू