मुंबई - दोन दिवसांपुर्वी मुंबई महानगरपालिकेच्या सायन रुग्णालयात कोरोना रुग्णाच्या मृतदेहाजवळच इतर रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या प्रकारामुळे रुग्णालय प्रशासनावर जोरदार टीका झाली होती. हे प्रकरण ताजे असतानाच, याच रुग्णालयातून एक कोरोनाचा रुग्ण पळून जाताना त्याला सुरक्षा रक्षकांनी पकडल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. रुग्णाला पकडल्यामुळे संबंधीत सुरक्षा रक्षकांचे कौतुक केले जात आहे.
एकीकडे मृतदेहाजवळ इतर रुग्णांचे उपचार व्हिडिओ प्रकरणी सायन रुग्णालयाचे वाभाडे निघाले असताना आणखी एक व्हिडिओ आता समोर आला आहे. 3 मे च्या रात्री सुमारे 9:25 वाजता वॉर्ड क्रमांक 5 च्या समोरील जाळीच्या खिडकीमधून एक कोरोना संशयित रुग्णाने उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. यावेळी कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षक लहु चव्हाण यांनी त्या रुग्णाला पकडून पुन्हा वॉर्डमध्ये आणले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. यामुळे सुरक्षा रक्षकांचे कौतूक केले जात आहे.
हेही वाचा.... सायन रुग्णालय प्रकरणी चौकशी समितीची स्थापना, दोषींवर होणार कारवाई
सायन रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या वॉर्डमध्ये मृतदेह प्लास्टिकमध्ये बांधून ठेवण्यात आले. त्या मृतदेहांच्या बाजूलाच इतर रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाला चौकशी समिती स्थापन करावी लागली आहे. या समितीचा अहवाल 24 तासात देऊन दोषींवर कारवाई करू, असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.