मुंबई - कोरोना व्हायरसचे संक्रमण थांबवण्यासाठी सर्व स्तरातून उपाययोजना केल्या जात आहे. त्यातच एक चिंतेची बातमी समोर येत आहे. राज्यात नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करावे, यासाठी रस्त्यावर 24 तास पहारा देणाऱ्या राज्य पोलीस खात्यातील 361 पोलिसांना देखील कोरोनाची लागन झाली आहे. त्यात 51 पोलीस अधिकारी आणि 310 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
दिलासादायक बाब म्हणजे 23 पोलीस अधिकारी आणि 26 पोलीस कर्मचारी बरे झाले आहेत. तर अजूनही 28 पोलीस अधिकारी आणि 281 पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सध्या सुरू आहेत. दुर्दैवाची गोष्ट आतापर्यंत 3 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
हेही वाचा... मुंबईतील कोरोनाग्रस्त कच्छमध्ये आलाच कसा? गुजरात प्रशासनाचे आरोग्य संचालंकाना पत्र
लॉकडाऊनच्या काळात पोलिसांची दमदार कामगिरी...
राज्यभरात 22 मार्च ते 2 मे या काळात 91217 गुन्हे दाखल झाले आहेत. 18,048 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. क्वारंटाईनचे नियम मोडणाऱ्या 630 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर पोलिसांवर हल्ला होण्याच्या 173 घटना घडल्या असून या प्रकरणी 659 जणांना अटक करण्यात आली आहे. राज्यभरात लॉकडाऊन च्या कालावधीत पोलीस विभागाच्या 100 या नियंत्रण क्रमांकावर आतापर्यंत 82,894 फोन आले आहेत. अवैद्य वाहतूक संदर्भात 1255 गुन्हे दाखल करण्यात आले असून तब्बल 51,719 वाहन जप्त करण्यात आली आहेत.