मुंबई - औरंगाबाद जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार अब्दुल सत्तार यांनी शनिवारी मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. या भेटीनंतर अब्दुल सत्तार हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. तर दुसरीकडे सत्तार हे काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचेही बोलले जात आहे.
काँग्रेसने औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून नुतकेच सुभाष झांबड यांना उमदेवारी जाहीर केली असून त्यावर सत्तार हे नाराज झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील काही महिन्यापूर्वीच सत्तार यांना पक्षाने उमेदवारीसाठी विचारणा केली असता, त्यांनीच झांबड यांचे नाव सुचविले होते. मात्र, आता त्यांनीच झांबड यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाराजी व्यक्त केल्याने काँग्रेसमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे आणि सत्तार यांचे वैर मराठवाड्यात प्रसिद्ध असल्याने सत्तार यांना भाजपमध्ये घेण्यासाठी जोरदार विरोध होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे सत्तार यांनी मागील वर्षेभरापूर्वीच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीदरम्यान आपल्या पदाचा राजीनामा पक्षाकडे दिला होता. मात्र, आठच दिवसांनी त्यांना उपरती झाली आणि तो आपण दिलाच नसल्याचा दावा केला होता. यामुळे पक्षाकडे त्यांचा रितसर राजीनामा येत नाही तोपर्यंत कोणतीही भूमिका स्पष्ट केली जाणार नसल्याचे काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याकडून सांगण्यात आले.