मुंबई - केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणांमुळे पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेलासह इतर जीवनावश्यक वस्तूंची महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. महागाईने जनतेचे जगणे कठीण झाले आहे. या जीवघेण्या महागाई विरोधात मुंबई काँग्रेसकडून ७ जुलै ते १७ जुलै २०२१ या कालावधीत मुंबईतील २२७ वॉर्डमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आज आयोजित पत्रकार परिषदमध्ये दिली.
हेही वाचा - School Reopen : कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार
अकरा दिवस चालणार आंदोलन -
भाई जगताप यांनी सांगितले की, देशभरात महागाई वाढली आहे. कोरोना काळ असला तरी जगभरात इंधनाची परिस्थिती वेगळी आहे. तत्कालीन काँग्रेसचे पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात 140 डॉलर प्रति क्रूड ऑईल बॅरेल होते. त्यावेळी 72 रुपये प्रति लिटर पेट्रोल नागरिकांना मिळत होते. सध्या क्रूड ऑईलचे दर कमी झाले आहेत. तरीही आपल्या देशात चुकीच्या धोरणामुळे इंधनाचे दर गगनाला भिडत आहे. त्यामुळे, नागरिकांना महागाईची झळ सोसावी लागत आहे. या महागाईविरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार आंदोलनाचा कालबद्ध कार्यक्रम मुंबई काँग्रेसने हाती घेतला आहे. त्यानुसार ७ जुलै ते १७ जुलै २०२१ या कालावधीत मुंबईतील २२७ वॉर्डमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईतील २२७ वॉर्डमध्ये ही आंदोलने कोविडचे निर्देश पाळून करण्यात येतील. या आंदोलनात मुंबई महिला काँग्रेसचा प्रामुख्याने सहभाग असेल. तसेच, मुंबईतील १०० पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात मुंबई युवक काँग्रेस, एन.एस.यू.आय.च्या प्रमुख उपस्थितीत स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येईल.
कोविड प्रभावित कुटुंबीयांसाठी संपर्क अभियान -
१२ जुलै २०२१ पासून प्रत्येक वॉर्डमध्ये १० काँग्रेस कार्यकर्ते कोविड प्रभावित कुटुंबांना भेट देणार असून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. सदर अभियान ३० दिवस निरंतर सुरू राहणार आहे. मुंबईतील कष्टकरी, श्रमिक, ऑटोरिक्षा चालक, घरेलू कामगार, मेकॅनिक, फेरीवाले, शिक्षक इत्यादी कुटुंबांचा या संपर्क अभियानात समावेश करण्यात आला आहे. या कुटुंबांकडून माहिती घेऊन त्यांना यथोचित सहाय्य करण्यात येईल, अशी माहिती सुद्धा भाई जगताप यांनी दिली.
हेही वाचा - मुंबई महानगरपालिकेच्या 'या' निर्णयामुळे सुमारे २०० डॉक्टर-नर्सच्या नोकरीवर गदा