मुंबई : महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजप व शिवसेनेत रणधुमाळी रंगली असताना दिवसेंदिवस वाढत असलेली कोरोनाबाधित रुग्णांची संख्यासुद्धा सर्वच राजकीय पक्षांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. १० जूनला राज्यसभेची निवडणूक होत आहे. महाराष्ट्रात ५ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत भाजप व महविकास आघाडी या दोघांनी सहावा उमेदवार निवडणूक रिंगणात उभा केल्याने ही निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही. परंतु, या निवडणुकीत प्रत्येक आमदाराचे एक-एक मत महत्त्वाचं असताना राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.
निवडणूक चुरशीची होणार : विशेष करून मुंबईत ही बाब चिंताजनक असून बहुतेक सर्वच पक्षांच्या आमदारांचा मुक्काम आता मुंबईतच असल्याने टेंन्शन अजून वाढले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे स्वतः कोरोना बाधित झाले आहेत. त्या कारणाने ते कशा पद्धतीने मतदान करणारा हेसुद्धा पहावे लागणार आहे. त्याचबरोबर भाजपचे पिंपरीचे आमदार लक्ष्मण जगताप यांची तब्येत ही बरीच खालावली आहे. ४० दिवसांनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे तशा पद्धतीची विनंती निवडणूक आयोगाला करणार असल्याचे भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले आहे. राष्ट्रवादीचे नेते, मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नीलाही कोरोनाची बाधा झाली असून, धनंजय मुंडे यांनाही ताप आला असल्याचे समजत आहे. अशा परिस्थितीमध्ये मतदान करण्यासाठी बाहेर पडताना इतरांना त्याचा संसर्ग होणार नाही, याची काळजी घेणेही गरजेचे आहे.
सर्वांनी काळजी घेणे गरजेचे : मुंबईतील तापमानाचा पारा हा ३५ अंशाच्या पार गेला आहे. पावसाळा तोंडावर येऊन ठेपला आहे. अशा या बदलत्या परिस्थितीत करोना रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जून किंवा जुलै महिन्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेचीही शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप या प्रत्येक पक्षांनी त्यांच्या आमदारांना मुंबईतील विविध हॉटेल्समध्ये एकत्रित ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याने आमदारांनाही 'कोरोना' हा चिंतेचा विषय झाला आहे. कोरोनाचा संसर्ग हा झपाट्याने वाढत असल्याने जर एखाद्या आमदाराला त्याची बाधा झाली तर त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींनाही लागण होऊ शकते म्हणून सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे आहे.
राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढ : राज्यात काल सोमवारी १०३६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. राज्यातील रुग्णांची एकूण संख्या ७८,९४,२३३ झाली आहे. काल ३७४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,३८,९३८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. सध्या राज्यातील मृत्युदर १.८७ टक्के आहे.