मुंबई - प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांना ड्रग्ज प्रकरणात मुंबईच्या फोर्ट कोर्टाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. याविरोधात त्यांनी मुंबईच्या फोर्ट न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावर आज सुनावणी पार पडली. यामध्ये न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर केला आहे.
पर्यायी तारखेची केली होती मागणी -
नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) तसेच मी आज इतर खटल्यांमध्ये व्यग्र आहे. त्यामुळे कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया यांच्या जामीन अर्जावर युक्तिवादासाठी पर्यायी तारीख देण्यात यावी, अशी मागणी विशेष सरकारी वकील अतुल सरपांडे यांनी केली होती. त्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
काय आहे प्रकरण -
शनिवारी मुंबईतील भारती हिच्या घरावर एनसीबीने छापा टाकला. यावेळी तेथून गांजा जप्त करण्यात आला. चौकशी दरम्यान भारतीसिंहने आपण ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली. सुमारे 6 तासांच्या चौकशीनंतर भारतीला अटक करण्यात आली. यानंतर हर्ष लिंबाचियालाही रात्री उशिरा अटक करण्यात आली
रविवारी भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांना प्रथम वैद्यकीय आणि कोरोना चाचणीसाठी नेण्यात आले. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. भारती आणि हर्ष यांच्यासह दोन ड्रग्ज पेडलरही कोर्टात हजर झाले. एनसीबीने भारतीचा पती हर्षचा न्यायालयाकडून रिमांड मागितला होता, पण न्यायालयाने त्यांची ही मागणी फेटाळली. त्यानंतर कोर्टाने या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
अभिनेत्री भारती सिंह विरोधात मुरबाड पोलिसांत तक्रार
कलर्स (HD) चॅनेलवरील वरील 'खतरा खतरा' या एका टीव्ही शोमध्ये अभिनेत्री भारती सिंह हिने आदिवासी समाजाला उद्देशून जातीवाचक आक्षेपार्ह वक्तव्य करत गैरकृत्य केल्याविरोधात ठाण्याच्या मुरबाड पंचायत समितीच्या उपसभापती अरुणा रघुनाथ खाकर यांनी अभिनेत्री भारतीविरुद्ध मुरबाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. कलर्स (HD) चॅनेलवरील शोमध्ये संपूर्ण आदिवासी समाजाला उद्देशून विचित्र अंगविक्षेप करत जातीवाचक अपशब्द वापरत समाजाची चेष्टा केल्याचा आरोप यावेळी तक्रादारांनी केला होता. त्यामुळे आदिवासी समाजातर्फे त्यांच्या या कृत्याला आम्ही सर्व आदिवासी समाज म्हणून जाहीर निषेध करीत असून अभिनेत्री भारती सिंहच्या या गैरकृत्यामुळे आदिवासी समाजामध्ये संतापाची लाट पसरल्याचे पाहवयास मिळत आहे, असेही त्यांनी सांगितले होते.
कोण आहे भारती सिंह?
भारती सिंह ही स्टॅण्डअप कॉमेडियन आणि अभिनेत्री आहे. तीचा जन्म 3 जुलै 1980 मध्ये झाला होता. ती पंजाबमधील असून तीने 2017 मध्ये लेखक हर्ष लिंबचियासोबत लग्न केले होते. तिने आपल्या कारकीर्दीची सुरुवात 'इंडियन लाफ्टर चॅलेन्ज'मधून केली होती. त्यातील तीचे लल्ली हे पात्र फारच प्रसिद्ध झाले होते. भारती सिंहने कॉमेडी सर्कस, कॉमेडी सर्कस महासंग्राम, कॉमेडी सर्कस का जादू, कहानी कॉमेडी सर्कस की आणि कॉमेडी नाईट्स बचाओ, जुबली कॉमेडी सर्कस मध्ये काम केले आहे. तसेच तिने प्यार में ट्विस्ट मध्येही काम केले आहे. याचबरोबर तीने अनेक कार्यक्रमांचे निवेदन केले आहे.
दीपिका पादुकोणच्या मॅनेजरची चौकशी -
अभिनेत्री दीपिका पादुकोणची माजी मॅनेजर करिश्मा प्रकाशची एनसीबीने चौकशी केली होती. एनसीबीने यापूर्वी सप्टेंबरमध्ये करिश्मा प्रकाश हिचा जवाब नोंदवला होता. दीपिका व्यतिरिक्त एनसीबीने सुशांतच्या मृत्यूच्या चौकशीत ड्रग संबंधित प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि सारा अली खानवरही प्रश्न केला आहे. एनसीबीने तिन्ही अभिनेत्रींचे फोनही जप्त केले आणि त्यांना फॉरेन्सिक विभागात तपासासाठी पाठविले होते. सुशांत हा 14 जून रोजी मुंबईतील त्यांच्या फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूची एनसीबी, सीबीआय आणि ईडी चौकशी करीत आहेत.
फिरोज नाडियाडवालाही बजावले होते समन्स -
यापूर्वी बॉलिवूड निर्माता फिरोज नाडियाडवाला यांच्या घरी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) छापा टाकत, ड्रग्ज जप्त केले होते. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. तेव्हापासून एनसीबीकडून बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे खोदण्याचे काम सुरु आहे.
अमली पदार्थ प्रकरणी अभिनेता अर्जुन रामपालची चौकशी
बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल व त्याची प्रेयसी गॅब्रियल या दोघांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यांची चौकशीही झाली होती. माझे अमली पदार्थांच्या संदर्भात काहीही घेणे देणे नाही. माझ्या घरात जे औषध मिळाले आहे, त्याचे प्रिस्क्रिप्शन माझ्याकडे आहे, तसेच ते एनसीबीला दिले आहे, अशी प्रतिक्रिया अभिनेता अर्जुन रामपाल यांने मा ध्यमांशी बोलताना दिली होती. अर्जुनचा मित्र पॉल बार्टल याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) अटक केली होती. तसेच अर्जुन रामपाल याची प्रेयसी गॅबरीयल हिची सलग दोन दिवस चौकशी करण्यात आली होती.