मुंबई - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लस येण्याचे संकेत मिळत असून लसीचा साठा करण्यासाठी कांजूर येथील पालिकेच्या इमारतीतील तीन मजले आरक्षित केले आहेत. तर पालिकेच्या केईएम रुग्णालयात कोल्ड स्टोरेज रुम तयार करण्यात आली असून नियंत्रित तापमान असणारी ही रुम सज्ज ठेवल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
पहिली लस 'केईएम'मध्ये
कोरोना लसीचा साठा कांजूर येथे पालिकेच्या इमारतीत करण्यात येणार आहे. तर लस उपलब्ध झाल्यानंतर पहिली लस केईएम रुग्णालयात देण्याबाबत विचार सुरू असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, केईएम हॉस्पिटलमध्ये वैशिष्यपूर्ण रेफ्रिजरेटरसह कोल्ड स्टोरेज रूम तयार करण्यात आला आहे. कोविड लसीसाठी आवश्यक असणारे नियंत्रित तापमानाची कोल्ड स्टोरेज रूम असणार आहे. प्रत्येक रेफ्रिजरेटरला तापमान नियंत्रक रिमोट आणि मॉनिटर असणार आहे. विशेष म्हणजे वीजपुरवठा सुरळीत राखण्यासाठी पॉवर बॅकअप सिस्टम अॅक्टिव्ह असणार आहे. तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठराविक व्यक्तींनाच रूममध्ये प्रवेश दिला जाईल, असेही अधिकाऱ्याने सांगितले. तर गरजेनुसार लसीच्या साठवणुकीसाठी कोल्ड स्टोरेजची क्षमता वाढवण्यात येईल, असेही अधिकाऱ्याने सांगितले.
लसींची चाचणी सुरू
महापालिकेच्या केईएम आणि नायर रुग्णालयात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने बनवलेल्या कोव्हीशिल्ड लसीचा अभ्यास सुरू आहे. त्याचवेळी पालिकेच्या सायन रुग्णालयात भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीची चाचणी सुरू करण्यात आली आहे. सायन रुग्णालयात एक हजार स्वयंसेवकांवर चाचणी केली जाणार असून शनिवार ते आतापर्यंत १५ स्वयंसेवकांना लस टोचण्यात आल्याची माहिती डॉ. मोहन जोशी यांनी दिली.