मुंबई - वाहतुकीच्या कोंडीमुळे मुंबई शहराकडून पश्चिम उपनगरात जाण्यासाठी तीन तासाचा अवधी लागतो. त्यामुळे इंधनही वाया जाते. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. यावर उपाय म्हणून मुंबई महापालिकेकडून कोस्टल रोड प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पामुळे ३० टक्के इंधनाची बचत होणार असून मुंबईकरांचा प्रवासादरम्यान वाया जाणारा ७० टक्के वेळही वाचणार आहे. कोस्टल रोड प्रकल्प पूल आणि बोगद्याच्या मार्फत उभारला जात असून २०२२ नंतर हा प्रकल्प पूर्ण होईल. कोस्टल रोडचे काम तीन टप्प्यात केले जाणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.
कोस्टल रोड प्रकल्प -
दक्षिण मुंबईमधून पश्चिम उपनगरात जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यावर उपाय म्हणून महापालिका आणि सत्ताधारी शिवसेनेने कोस्टल रोड प्रकल्प हाती घेतला आहे. शामलदास गांधी मार्गावरील प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वरळी या दरम्यान १०.५८ किमी लांबीचा असणारा 'सागरी किनारा मार्ग' बांधल्यामुळे प्रवासाच्या वेळेत ७० टक्क्यांची तर ३० टक्के इंधन बचत होणार आहे. पर्यावरण पूरकताही साधली जाणार आहे. कोस्टल रोडवर २ किलोमीटरचे २ बोगदे खोदले जाणार आहेत. प्रियदर्शनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गालगत (मरिन ड्राईव्ह) असणाऱ्या 'छोटा चौपाटी'पर्यंत असणार असून ते 'मलबार हिल' च्या खालून जाणार आहेत. सदर दोन्ही बोगद्यांसाठीचे खोदकाम हे जमिनीखाली १० मीटर ते ७० मीटर एवढ्या खोलीवर करण्यात येत आहे. त्यासाठी मावळा या टीबीएम मशीनचा वापर केला जात आहे. बोगदे खोदण्याच्या कामाची सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ११ जानेवारी रोजी करण्यात आली. बोगदे खणण्याच्या कामाचे १०० मीटरहुन अधिक अंतर पूर्ण झाले आहे. तर कोस्टल रोडचे २० टक्क्याहून अधिक काम पूर्ण झाले आहे. अरबी समुद्राखालील तब्बल १७५ एकर जमिनीवर भराव टाकण्यात आला आहे. तर अजून १०२ एकर समुद्राखालील जमिनीवर भराव टाकण्यात येणार आहे. प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वरळी नंतर वरळी बांद्रा सिलिंक रोड वरून हा मार्ग पश्चिम उपनगरात जाणार आहे. बांद्रा पासून कांदिवली पर्यंत आणखी एक पूल बांधून ही हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे.
हेही वाचा - मनसुख हिरेन हत्या प्रकरण : एटीएसने दमणमधून ताब्यात घेतली व्होल्वो कार
बोगदे आणि मावळा मशीन -
कोस्टल रोड प्रकल्पासाठी दोन बोगदे खणले जात आहेत. प्रत्येकी दोन किलोमीटर लांबीचे बोगदे खणण्यासाठी १२.१९ मीटर व्यास असणारे भव्य असे 'मावळा' हे टीबीएम म्हणजेच 'टनेल बोरिंग मशीन' वापरण्यात येत आहे. ही टीबीएम मशीन ४ मजली इमारती एवढी उंच असून त्याची लांबी तब्बल ८० मीटर एवढी आहे. या मशीनची पाती ही प्रत्येक मिनिटाला साधारणपणे २.६ वेळा गोलाकार फिरु शकणारी आहेत 'मावळा' या संयंत्राचे प्रत्यक्ष प्रचलन हे संगणकीय पद्धतीने होत आहे. तर 'मावळा' या संयंत्राची उर्जा क्षमता ही ७,२८० किलोवॅट एवढी असून प्रकल्प कालावधी दरम्यान दररोज़ सरासरी ८ मीटर बोगदा खणला ज़ाईल, अशी अपेक्षा आहे. दोन्ही बोगदे हे दोन बाजूंच्या वाहतुकीसाठी अर्थात येणाऱ्या व जाणाऱ्या वाहतुकीसाठी स्वतंत्रपणे उपयोगात येतील. सुरक्षेची व प्रतिबंधात्मक उपायोजना म्हणून दोन्ही बोगद्यांना जोडणारे एकंदर ११ छेद बोगदे (Cross Tunnel / Cross Passages) देखील महाबोगद्यांचा भाग असणार आहेत. दोन्ही महाबोगदे खणण्यासाठी प्रत्येकी साधारणपणे ९ महिने लागणार असून दोन्ही बोगद्यांसाठी २ महिन्याचा अतिरिक्त कालावधी ज़मेस धरण्यात आला आहे. यानुसार महाबोगदे खणण्यासाठी सुमारे २० महिन्यांचा कालावधी लागणार आहे. मावळा या संयंत्राद्वारे बाहेर टाकण्यात येणा-या पाण्याचा पुनर्वापर करता यावा, यासाठी 'प्रक्रिया केंद्र' देखील प्रकल्पाच्या ठिकाणी उभारण्यात आले आहे. तर खोदकामातून निघणारे खडक व खडी याचा उपयोग भराव कामासाठी करण्यात येणार आहे. बोगद्यामध्ये अपघात झाल्यास, आग लागल्यास त्याठिकाणी पोहचण्यासाठी दोन्ही बोगद्यांना जोडणारे 'छेद बोगदे' (क्रॉस टनेल) बांधले जाणार आहेत. बोगद्यामध्ये हवा खेळती राहावी म्हणून अत्याधुनिक 'सकार्डेा नोझल' यंत्रणा उभारली जाणार आहे. बोगद्यात अत्याधूनि अग्निशमन यंत्रणा उभारली जाणार आहे. वाहतुक सुरक्षेच्या व मानवी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बोगद्यांमध्ये जागोजागी सीसीटिव्ही लावले जाणार असून त्याद्वारे प्राप्त होणा-या चित्रणाचे नियमितपणे अवलोकन केले जाणार आहे. त्याचबरोबर आपत्कालिन परिस्थितीत किंवा अन्य आवश्यक प्रसंगी संवाद साधण्यासाठी बोगद्यांमध्ये ध्वनीक्षेपण व्यवस्था देखील असणार आहे. या दोन्ही बाबींसाठी मध्यवर्ती समन्वय यंत्रणा असणार आहे.
या कंत्राटदारांची निवड -
मुंबई महापालिकेने पश्चिम उपनगरामधील वाहतुकीवर उपाय म्हणून कोस्टल रोड बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. हा प्रकल्प मरीन ड्राईव्ह आणि बोरीवलीला जोडणारा असून या कोस्टल रोड २९ किलोमीटर लांबीचा असणार आहे. भूपृष्ठावर, भूमिगत, उड्डाणपूल, टनेलमधून या रस्त्याचे काम होणार आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत १६ हजार कोटी रूपयांच्या जवळपास आहे. या प्रकल्पापैकी प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते प्रियदर्शनी उद्यान येथील कामासाठी एल अँड टी ला ४,२२० कोटी रुपये, प्रियदर्शनी उद्यान ते बडोदा पॅलेस कामासाठी एल अँड टी ला ५,२९० कोटी, तर बडोदा पॅलेस ते वांद्रे-वरळी सिलिंकचे दक्षिणेकडील टोक या कामासाठी एचसीसी-एचडीसीला ३,२११ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे.
हेही वाचा - 'ए भाई , तू जो कोण असशील' अमृता फडणवीस आक्रमक
न्यायालयाची १५४ दिवसांची स्थगिती -
कोस्टल रोड प्रकल्पासाठी मुंबईतील अनेक ठिकाणच्या किनाऱ्यांवर भराव टाकण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकल्पामुळे स्थानिक मच्छिमार, कोळीवाडे, ब्रीचकॅन्डी येथील रहिवासी व काही सामाजिक संस्थांनी विरोध करत उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. कोस्टल रोडसाठी समुद्रात भराव टाकल्याने समुद्री जीवाला धोका निर्माण होईल, या आशयाची याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. प्रकल्प राबवताना महापालिका प्रशासनाने पर्यावरण विषयक परवानग्या घेतल्या नसल्याचे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आले होते. या प्रकल्पासाठी १६ जुलै रोजी उच्च न्यायालयाने तर १९ जुलैला रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती.नवे बांधकाम न करण्याच्या अटीवर न्यायालयाने १५४ दिवसांनी स्थगिती उठवली आहे.
कोळी बांधव, समुद्र जीवांची काळजी -
कोस्टल रोडमुळे समुद्री जीवाला धोका निर्माण होणार अशी भीती व्यक्त केली जात आहे. न्यायालयाने कोस्टल रोडच्या कामासाठी असलेली स्थगिती उचलल्यानंतर पालिकेने समुद्र जीव आणि कोळी बांधवांची गंभीर दखल घेतली आहे. सिमेंट काँक्रीटच्या बांधकामांमुळे मासे, खेकडे, कोळंबी आदी समुद्र जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून इज्राइल तंत्रज्ञानावर आधारित इको फ्रेंडली विटा वापरल्या जाणार आहेत. या विटांचा थर कोस्टल रोडच्या भिंती आणि पिलरच्या बाजूला लावण्यात येणार आहे. या विटांमुळे मासे, खेकडे, कोळंबी आदी समुद्र जीवांचे प्रजनन होणार आहे. यामुळे मच्छिमारांनाही आपला व्यवसाय करणे सोपे होणार आहे. तसेच कोळी बांधवाना आपल्या बोटी समुद्र किनारी आणता याव्यात यासाठी योग्य जागा ठेवली जाणार आहे.
हेही वाचा - एटीएसने जप्त केलेल्या व्होल्वो कारची फोरेंसिक तपासणी सुरू