मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची वर्षा बंगल्यावर दुपारी साडेबारा वाजता बैठक होणार आहे. मशिदीवरील लाऊड स्पीकरच्या मुद्दावर या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज ठाकरे यांनी 3 मेच्या पूर्वी मशीदीवरील भोंगे काढण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या होण्याऱ्या या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मेपर्यंत बेकायदेशीरपणे मशिदीवरील लावण्यात येणारे लाऊड स्पीकर उतरवण्याची मागणी केली आहे. जर भोंगे उतरवले नाही, तर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावण्याचे आदेश त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी परिस्थिती आहे का? याबाबत देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावू नयेत, असे कोर्टाचे आदेश आहेत. त्यातच राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टिमेटमनंतर बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.
पोलीस महासंचालक घेणार वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक - भोंग्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील वातावरण तापण्याची शक्यता आहे. त्यामुळेच राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ सर्व जिल्ह्यातील पोलीस प्रमुखांची बैठक लवकरच घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी पोलीस प्रशासन देखील सतर्क झाले आहे. शनिवारी 16 एप्रिलला रात्री देखील मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी कायदा-सुव्यवस्थेबाबतची बैठक घेतली होती. त्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गृहमंत्र्यांनी कोणीही कायद्याचा भंग करू नये, आवाजाच्या मर्यादेचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांकडून करण्यात आले आहे.
पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त जारी करणार मार्गदर्शक सूचना - राज ठाकरे यांनी 3 मेच्या अगोदर मशीदीवरील अनाधिकृत भोंगे काढून टाकावे अन्यथा लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा सुरू करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारने याबाबत गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची या विषयावर बैठक होत आहे. याबाबत बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, की पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त भोंग्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करतील. आगामी दोन दिवसात या सूचना जारी करण्यात येतील. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. कोणीही कायदा हातात घेतल्यास त्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.