मुंबई - तब्बल ३९ दिवसानंतर शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज सकाळी ११ वाजता विस्तार होत आहे. परंतु, या विस्तारापूर्वी शिंदे गटाच्या सर्व आमदारांची सकाळी ९:३० वाजता सह्याद्री अतिथी गृहामध्ये महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. विशेष करून मंत्री पदासाठी बऱ्याच इच्छुक असलेल्या आमदारांना मंत्रीपद भेटणार नसल्याने त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न या बैठकीत केला जाणार आहे.
अखेर मुहूर्त सापडला - एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ३० जूनला अनुक्रमे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात ३९ दिवस उलटले, तरी विस्ताराचे गाडे अडूनच होते. मंत्रिमंडळ विस्तारासाठी दोघांनी अनेकदा दिल्लीवाऱ्या सुद्धा केल्या. मात्र, तरी भाजप पक्ष नेतृत्वाकडून हिरवा कंदील मिळत नव्हता. राज्यातील सत्ता संघर्ष बाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराविषयी अनिश्चितता असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे विरोधी पक्ष शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिंदे सरकारवर टीका सुरू केली होती. आता या पार्श्वभूमीवर अखेर काल दिल्लीतून हिरवा कंदील भेटल्यानंतर आज मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. परंतु, या विस्तारापूर्वी शिंदे गटाच्या आमदारांची महत्त्वाची बैठक पार पडत आहे.
आमदारांची नाराजगी दूर करण्याचे प्रयत्न - हा मंत्रिमंडळ विस्तार पूर्ण स्वरूपाचा नसून ठराविक मंत्र्यांनाच आज विस्तारामध्ये शपथ दिली जाणार आहे. एकंदरीत १५ ते २० आमदार दोन्ही बाजूने मंत्रीपदाची शपथ घेणार असे सांगितले जात आहे. शिंदे गटाकडून दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, संदीपान भुमरे, संजय राठोड, शंभूराजे देसाई, दीपक केसरकर, तानाजी सावंत, संजय शिरसाट यांच्या नावाची चर्चा आहे. परंतु, शिंदे गटासोबत असलेल्या ४० आमदारांपैकी बरेच आमदार हे मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. म्हणूनच या बैठकीमध्ये ज्या आमदारांना मंत्रिपद दिले जाणार नाही. या आमदारांची समजूत काढण्याचे प्रयत्न केले जाणार असून दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बंडखोर आमदार शिवसेनेच्या संपर्कात - मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्व राज्याचे लक्ष लागलेलं असताना दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तारानंतर पक्षांतर्गत बंडाळी होऊ नये, म्हणून एकनाथ शिंदे पूर्ण प्रयत्न करणार आहेत. नाराज असलेल्या आमदारांना समजावण्याची महत्त्वाची भूमिका त्यांच्यावर असून दुसरीकडे बंडखोर आमदारांपैकी १२ आमदार आमच्या सोबत असल्याचं शिवसेना नेते विनायक राऊत यांनी सांगितल्यानंतर शिंदे यांची डोकेदुखी वाढलेली आहे.
हेही वाचा - Maharashtra Cabinet Expansion : शिंदे सरकार अॅक्शन मोडवर; आज मंत्रीमंडळ विस्तार, तर बुधवारपासून अधिवेशन