मुंबई - मराठी माणसाची अस्मिता जागवणाऱ्या शिवसेनेचा आज 53 वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त आज मुंबईतील शीव येथील षण्मुखानंद सभागृहात सायंकाळी वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दुसऱ्या पक्षाचा नेता वर्धापन दिनाला शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजप युतीच्या रणनितीचे मार्गदर्शन यावेळी होणार आहे. शिवसेनेच्या वर्धापनदिनाला पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शनपर भाषणही होणार आहे.
लोकसभेप्रमाणे महाराष्ट्र विधानसभाही शिवसेना आणि भाजपने एकत्र येऊन लढावी आणि मोठा विजय मिळवावा, यासाठी युतीचे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर येत आहेत. युतीच्या विजयासाठी शिवसैनिकांची मने वळवण्यात आज मुख्यमंत्र्यांना यश येते का, हे पाहणे औत्सुकत्याचे ठरणार आहे.