रायपूर - छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी विनायक दामोदर सावरकरांच्या बहाण्याने भाजपवर निशाणा साधला आहे. सीएम बघेल यांनी सावरकरांना भारताच्या विभाजनासाठी जबाबदार धरले आहे. त्यांनी म्हटले आहे की, देशाचे विभाजन करण्याचा पहिला प्रस्ताव सावरकरांनी दिला होता, जो नंतर मुस्लिम लीगने स्वीकारले. बघेल पुढे म्हणाले की, सावरकरांच्या प्रस्तावातून दोन राष्ट्रांचा सिद्धांत जन्माला आला. म्हणूनच देशाच्या फाळणीला सावरकर जबाबदार आहेत.
सावरकरांनी सर्वात पहिल्यांदा देशाचे विभाजन केले - सीएम बघेल
मुख्यमंत्री बघेल इतके बोलूनच थांबले नाहीत, तर त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या वक्तव्याचाही समाचार घेतला. बघेल म्हणाले, की "त्यावेळी सावरकर कुठे होते आणि महात्मा गांधी कुठे होते? सावरकर तुरुंगात असताना महात्मा गांधी त्यांच्याशी कसे बोलले?" ते पुढे म्हणाले की, "सावरकरांनी दया याचिका दाखल केली आणि त्यानंतर ते ब्रिटिशांसोबत राहू लागले. 1925 मध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर सावरकर 'टू नेशन थ्योरी'ची बाजू मांडणारे पहिले व्यक्ती होते."
राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावरुन वाद
राजनाथ सिंह म्हणाले होते की, वीर सावरकरांना बदनाम करण्यासाठी मोहीम चालवली जात आहे. त्यांच्याबद्दल असे म्हटले जाते की त्यांनी जन्मठेपेच्या काळात ब्रिटिश राजवटीत दया याचिका दाखल केली होती. तर महात्मा गांधींनी त्यांच्याकडे दया याचिका मागितली होती. ते म्हणाले होते की सावरकरांना हिंदूवादी म्हटले जाते. सावरकरांचा हिंदुत्वावर विश्वास होता, पण ते हिंदूवादी नव्हते. ते राष्ट्रवादी होते. ते 20 व्या शतकातील सर्वात मोठे सैनिक आणि संरक्षण तज्ञ होते. राजनाथ सिंह यांच्या या विधानावर छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी पलटवार करताना म्हटले की, "ही तर नवीच गोष्ट झाली."
हेही वाचा - भाजपने व संघाने सावरकरांना पुन्हा-पुन्हा अडचणीत आणू नये. जयंत पाटलांचा टोला