मुंबई - बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरण रोज नवीन वळणावर असताना एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्यावर वैयक्तिक आरोप केले जात आहेत. याविषयी भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी अल्पसंख्यांक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांच्यासह महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणाची संपूर्ण शहानिशा करणारे एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीयांवर टीकाटिप्पणी होत आहे. यावरून भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ संतापल्या आहेत.
हेही वाचा-तो दाढीवाला व्यक्ती काशिफ खान, मंत्री नवाब मलिक यांचा खुलासा
काय म्हणाल्या चित्रा वाघ?
महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक हे खुलेआम एका महिलेच्या कौटुंबिक विषयाबाबत सर्व माध्यमांपुढे नाहक बदनामी करत आहे. मौलाना खरे बोलत आहे की तिच्याजवळ असलेले सरकारी कागदपत्र? याची शहानिशा न्यायालयीन प्रक्रियेतच होऊ शकते. पण तिच्या व्यक्तीगत आयुष्याचा माध्यमांपुढे सार्वजनिक बाजार मांडण्याचा अधिकार नवाब भाईंना कोणी दिला? असा प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा-माझा नवरा खोटारडा नाही, रोज काय स्पष्टीकरण द्यायचे- क्रांती रेडकर
मुख्यमंत्री गप्प का?
साध्या ट्विटवर गुन्हा दाखल करणारे मुख्यमंत्री आज उघडपणे एका महिलेची बदनामी होत असताना गप्प का आहेत? पुन्हा एकदा सिद्ध झाले की, ज्या काँग्रेसी प्रवृत्तीने डॅा. बाबासाहेब आंबेडकरांचा साम-दाम-दंड-भेद वापरून निवडणूकीत पराभव केला होता. ती काँग्रेसी प्रवृत्ती जेव्हा सत्तेवर येते तेव्हा मागासवर्गीय आणि शोषितांवर अन्यायच होतात, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला. नवाब मालिकांवर आदळ आपट करणारे भाजप या प्रकरणात काँग्रेसी प्रवृत्तीला जबाबदार ठरवत थेट काँग्रेससह महाविकास आघाडीवर निशाणा साधताना दिसत आहे.
क्रांती रेडकरचे मुख्यमंत्र्यांना पत्र-
क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणात आर्यन खानच्या अटकेनंतर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर होत असलेल्या विविध आरोपांच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री क्रांती रेडकरने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहतेय. तुम्ही योग्य तो न्याय करा,' अशी विनंती क्रांतीने या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तुम्ही कधीच माझ्यावर व माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही याची मला खात्री आहे. म्हणून एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहतेय. तुम्ही योग्य तो न्याय करा अशी विनंती क्रांतीने पत्राद्वारे केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे समीर वानखेडे यांच्यावर विविध आरोप करत आहेत.