मुंबई - कुर्ला नेहरू नगर येथील नाईक नगर सोसायटीमधील डी इमारतीचा काही भाग सोमवारी रात्री कोसळला. ( Kurla Building Collapsed ) या दुर्घटनेत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाला ( Mumbai Municipal Corporation) जाग आली असून, या इमारती धोकादायक असल्याचे बॅनर लावण्यात आले आहे. यामुळे पालिकेच्या कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
इमारतीचा भाग कोसळला - कुर्ला पूर्व, नाईक नगर सोसायटी, शिवसृष्टी रोड येथील कलेक्टर यांच्या जागेवरील डी इमारतीचा काही भाग सोमवारी रात्री 11.50 च्या सुमारास कोसळला. ही चार मजली इमारत होती. इमारतीचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले. अग्निशमन दल आणि एनडीआरएफ यांच्याकडून काल रात्रीपासून शोध मोहीम सुरु आहे. आतापर्यंत एकूण 33 जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात बचाव पथकांना यश आले आहे. त्यापैकी 19 जणांचा मृत्यू झाला आहे.
ऑडिटरवर कारवाई - ही इमारत 2014 आणि 2015 मध्ये खाली करून पाडावी असे महापालिकेकडून सांगण्यात आले होते. 2016 मध्ये इमारतीचे लाईट आणि पाणी कापण्यात आले होते. मात्र, स्ट्रक्चरल ऑडिटरने ही इमारत दुरुस्त करता शकते असा अहवाल दिला. त्यानंतर इमारतीची कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. इमारत कोसळल्यावर चुकीच ऑडिट करणाऱ्या ऑडिटरची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पालिका आयुक्तांनी दिली.
इमारत कोसळल्यावर बॅनर - नाईक नगर सोसायटीमधील डी विंग कोसळल्यावर बचाव कार्य सुरु असताना आदित्य ठाकरे, सुभाष देसाई आदी मंत्र्यांनी, पालिका आयुक्त, आदींनी घटनास्थळांला भेट दिली. या भेटी दरम्यान धोकादायक इमारती लोकांना ओळखता याव्यात यासाठी बॅनर लावावेत असे आदेश आयुक्तांनी दिले होते. तसे बॅनर इमारत कोसळल्यावर बचाव कार्य सुरु झाल्यावर मंगळवारी दुपारी लावण्यात आले आहे.
धोकादायक इमारत जाहीर - याबाबत बोलताना ज्या इमारती धोकादायक आहेत. त्यांना पालिका नोटीस देऊन त्या नागरिकांना खाली करायला सांगते. नागरिकांनी अशा इमारतीमध्ये राहू नये, म्हणून लाईट पाणी कापते. कुर्ला येथे जी इमारत कोसळली आहे. त्या इमारतीचे चुकीचे स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट दिल्याचे समोर आले आहे. यासाठी नाईक नगर सोसायटीमधील इतर 3 इमारती खाली केल्या असून त्या धोकादायक जाहीर केल्या आहेत, अशी माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली आहे.
हेही वाचा- औरंगाबाद नामांतर : शासनाच्या GR मध्ये संभाजीनगर उल्लेख; एमआयएम-शिवसेना आमनेसामने