मुंबई - देशभरात आजपासून ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षावरील विविध आजार असलेल्या नागरिकांच्या कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र कोविन अॅपमधील तांत्रिक अडचणी दूर झाल्यावर तब्बल साडे सहा तासाने म्हणजेच दुपारी साडे तीन वाजता लसीकरणाला सुरुवात झाली. दरम्यान लस घेतल्यावर मला घराबाहेर जाता येणार असल्याने आनंद होत असल्याची प्रतिक्रिया ८५ वर्षाच्या महेंद्र दोशी यांनी दिली.
खासगी रुग्णालयात लसीकरण -
मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. कोरोना विरोधात करण्यात आलेल्या उपाय योजनांमुळे काही प्रमाणात कोरोना आटोक्यात आला. मात्र फेब्रुवारीपासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. याच दरम्यान १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आजपासून ६० वर्षावरील जेष्ठ नागरिक आणि ४५ वर्षावरील विविध आजार असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. पालिका आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये लस मोफत दिली जात आहे तर खासगी रुग्णालयात २५० रुपये घेऊन ही लस दिली जात आहे.
मुंबईत आजपासून तीन खासगी रुग्णालयात लसीकरणाला परवानगी देण्यात आली. घाटकोपर येथील हिंदू महासभा रुग्णालयात सकाळी ९ वाजल्यापासून लाभार्थी लस कधी मिळेल याची वाट पाहत होते. दुपारचे ३ वाजले तरी लसीकरणाला सुरुवात झाली नव्हती. पालिका अधिकारी आणि आयटी विभागाने येऊन प्रयत्न केल्यानंतर तब्बल साडे सहा तासानंतर लसीकरणाला सुरुवात झाली. या दरम्यान जे लाभार्थी लसीकरणाला आले होते त्यांनी घरी परतणे योग्य समजले. घरी गेलेल्या लाभार्थ्यांना रुग्णालयात बोलावून लसीकरणाला सुरुवात झाली. लसीकरण उशिरा सुरू झाल्याने सायंकाळी ६ वाजेपर्यंत लसीकरण सुरू ठेवून लक्ष पूर्ण केले जाईल असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
घराबाहेर जाता येणार याचा आनंद -
हिंदू महासभा रुग्णालयात महेंद्र दोशी या ८५ वर्षाच्या वयोवृद्ध व्यक्तींनी सहा तासाच्या प्रतिक्षेनंतर पहिली लस घेतली. यावेळी बोलताना, माझं वय ८५ वर्ष आहे. माझ्या घरात सहा जणांपैकी ४ जणांना कोरोना झाला. मी माझी पत्नी उषा दोशी वय वर्ष ८२ आम्हा दोघांना कोरोना झाला नव्हता. कोरोनामुळे एक वर्ष घरी बसून काढले आहे. आता लस घेतल्यावर मला घराबाहेर जाण्यास मिळणार असल्याने मला याचा आनंद वाटत आहे असे महेंद्र दोशी म्हणाले.