मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. रुग्णांना बेड्स, ऑक्सिजन मिळत नाही, अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीतही मुंबईमध्ये ५० टक्के नालेसफाई झाल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. पावसाळापूर्व कामे वेगाने सुरु आहेत. मुंबई शहर व उपनगरांतील नालेसफाईचे काम ५० टक्के पूर्ण झाले आहे, तसेच मिठी नदीतील गाळ काढण्याचे काम वेगाने सुरु असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली.
पालिका प्रशासन लागले कामाला -
मुंबईत मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाने शिरकाव केल्यापासून महापालिकेचा कोरोनाविरोधात लढा सुरु आहे. कोरोना काही प्रमाणात आटोक्यात आला असताना फेब्रुवारीपासून पुन्हा कोरोनात वाढ झाली आहे. कोरोनाविरोधात पालिकेची संपूर्ण यंत्रणा अहोरात्र काम करीत आहे. एकीकडे कोरोना रोखण्याचे काम सुरु असताना मुंबईत येत्या पावसाळ्यात पाणी साचू नये म्हणून पावसाळापूर्व कामे केली जात आहेत. दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते. मुंबईत पावसाचे पाणी साचू नये म्हणून पालिका प्रशासन कामाला लागले आहे.
नेदरलँडची टक्शर एम्फिबिअस मशीन
दरवर्षीं नालेसफाई करताना जेसीबी, माणसांचा वापर केला जातो. यंदा नालेसफाईसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जात आहे. शहरातील ब्रिटिशकालीन नाल्यांची सफाई करण्यासाठी स्वयंचलित रोबाटिक सीसीटीव्ही कॅमेरा नाल्यात सोडून पाहणीनुसार काम केले जात आहे. तर मिठी नदीच्या सफाईसाठी नदीच्या खोल भागात जाऊन समान पातळीवर गाळ काढला जात आहे. यासाठी नेदरलँडची टक्शर एम्फिबिअस मशीन तर नदीच्या कानाकोपर्यात जाऊन तरंगता कचर्याची सफाई करणारी स्विडनची सिल्ट पुशर मशीन वापरली जात आहे.
अशी केली जाते नालेसफाई
पावसाळ्याआधी एकूण १०० टक्के नालेसफाईपैकी ७५ टक्के काम पावसाळ्याआधी, १० टक्के पावसाळ्यात आणि १५ टक्के काम पावसाळ्यानंतर करण्यात येते. मुंबईत दरवर्षी १० एप्रिलला नालेसफाईचे काम सुरू केले जाते. मात्र यावर्षी एक महिना आधीच म्हणजे मार्चच्या पहिल्या आठवड्यातच नालेसफाईला सुरुवात करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
इतका काढला गाळ
शहरातील नाल्यांमधील ४०२६३.९६ मेट्रिक टन गाळ काढला जातो. आतापर्यंत ३९.७१ टक्के काम पूर्ण झाले आहे. पूर्व उपनगरातील ९६९०७.७३ मेट्रिक टन गाळापैकी ५१.२९ टक्के तर पश्चिम उपनगरातील १७०६२६.९३ मेट्रिक टन गाळापैकी ४९.९४ टक्के गाळ काढण्यात आला आहे. मिठी नदीमधील २८ टक्के गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती प्रशासनाने दिली.