मुंबई - पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी राज्य सरकारची भूमिका संशयास्पद आहे. मंत्रिमंडळातील एक सहकारी गेली अकरा दिवस गायब आहे. याची साधी चौकशीपण आपण करत नाही. यावरून हे लक्षात येत आहे, की पीडितेला न्याय मिळवून देण्याची या सरकारची तयारी नाही. त्यामुळे या सरकारचा निषेध आम्ही करतो, अशा शब्दात भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सरकारवर टीका केली.
कारवाई करण्याची मागणी
याप्रकरणी विरोधकांनी थेट वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेतले. त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर राठोड यांच्या चौकशीची मागणी पुढे आली. तेव्हापासूनच ते नॉट-रिचेबल आहेत. तब्बल 11 दिवसांपासून ते गायब आहेत.
वानवडीत केली होती आत्महत्या
पूजा चव्हाण काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील परळीमधून पुण्यात आली होती. पुण्याच्या वानवडी भागात मित्रांसोबत राहणाऱ्या पूजाला या काळात हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेण्याची गरज भासली. त्यानंतर काही दिवस गेले आणि रविवारी मध्यरात्री पूजाने वानवडी भागातील या इमारतीवरून उडी मारून तिचे आयुष्य संपवले. त्यानंतर पूजाने हे टोकाचे पाऊल का उचलले याची उलट सुलट चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. पूजा आणि तिच्या मित्राचे राज्य सरकारमधील एका मंत्र्यासोबतचे सार्वजनिक कार्यक्रमांमधील फोटो व्हायरल होण्यास सुरुवात झाली.