मुंबई - 'द काश्मीर फाइल्स' सिनेमामधील कलाकारांचा अपमान केल्याचे सांगत कॉमेडियन कपिल शर्मा यांच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला आहे. त्यांच्या शोवर बहिष्कार घालण्याची मागणी देखील भाजपाकडून करण्यात यावेळी करण्यात आली आहे. मुंबईतील दादासाहेब फाळके फिल्मसिटीमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी एकत्र येत घोषणाबाजी केली. जोपर्यंत कपिल शर्मा आपल्या शोच्या माध्यमातून माफी मागत नाही तोपर्यंत विरोध केला जाईल, अशी मागणी भाजपाने केली आहे.
दादासाहेब फाळके फिल्मसिटीत भाजपा कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी
भाजपा कार्यकर्त्यांनी फिल्मसिटीमध्ये प्रवेश करत कपिल शर्मा विरोधात घोषणाबाजी केली. भाजपा चित्रपत सेनेच्या वतीने यांच्यासह कार्यकर्त्यांनी फिल्मसिटीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. कपिल शर्माने ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा अपमान केला असून 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाच्या प्रमोशनला विरोध केला आहे. त्यामुळे भाजपा कपिल शर्मा शोला विरोध करत आहे. जोपर्यंत कपिल शर्मा आपल्या शोच्या माध्यमातून माफी मागत नाही, तोपर्यंत त्याला विरोध केला जाईल, अशी भूमिका भाजपाने घेतली आहे.
काय आहे प्रकरण?
'द काश्मिर फाईल्स' सिनेमात मोठे कलाकार नाहीत हे कारण देऊन प्रमोशनसाठी बोलावले नाही, असा आरोप दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी 'द कपिल शर्मा शो' वर केला होता. यावर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी कपिल आणि त्याच्या शोचा खरपूस समाचार घेणाऱ्या प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या. नेटकरी कपिलवर इतके भडकले होते की त्यांनी सोशल मीडियावर कपिलच्या शो ला बॉयकॉट करण्याची मोहिमच राबवली होती. त्यानंतरच या वादाला सुरुवात झाली. आता या वादाला राजकीय रंग आल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा - Rahul Kanal-Nitesh Rane : राहुल कनाल यांनी पाठवली नितेश राणेंना कायदेशीर नोटीस