मुंबई - सातारा व ठाण्यातील भाजपच्या काही नेत्यांनी बुधवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, विश्वजीत कदम या नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
साताऱ्यातील मान - खटाव येथील काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख यांनी काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी आता पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. युवक काँग्रेसमध्ये प्रतिकूल परिस्थितीत काम केलं होते, त्याची नोंद घेतली गेली नाही, माझी नेहमी मुस्कटदाबी झाली, असे पक्ष प्रवेशाच्या वेळी देशमुख यांनी म्हटले होते. मात्र त्यांनी आता पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मान खटावसारख्या दुष्काळी भागामध्ये 2 सूतगिरण्या चालू करण्यात आल्या आहेत. यातील एक सूतगिरणी कर्जमुक्त केली असून, भविष्यात मान-खटावमध्ये साखर कारखाना उभारणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
काही वेळा कटू निर्णय घ्यावे लागतात
रणजितसिंह देशमुख यांच्या पक्षप्रवेशावर बोलताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले की, रणजितसिंह देशमुख यांच्यावर ते पूर्वी काँग्रेसमध्ये असताना अन्याय झाला होता. मात्र पक्षात काही वेळ कटू निर्णय घ्यावे लागतात. त्याचा फटका रणजित सिंह यांना बसला.
सध्याचा काळ संकटाचा - बाळासाहेब थोरात
सध्या संकटाचा काळ आहे. सगळ्या कार्यकर्त्यांनी आपल्या जिल्ह्यात, राज्यात काँग्रेस पक्षाला वाढवायचे आहे. येणाऱ्या दिवसात आराम नाही; जोमाने कामाला लागा, तुम्ही काम करा आम्ही पाठीशी आहोत. तुम्ही मोठे व्हा म्हणजे पक्ष आपोआप मोठा होईल. अशी प्रतिक्रीया यावेळी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली. केंद्राच्या शेतकऱ्यांच्या धोरणाविरोधात काँग्रेसकडून सह्यांची मोहीम हाती घेण्यात आली असून, राज्यात कृषी विधेयकाच्या विरोधात 50 लाख शेतकऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्याचा दावाही यावेळी थोरात यांनी केला.
कोण आहेत रणजितसिंह देशमुख?
रणजित सिंह देशमुख हे मूळचे काँग्रेसचे नेते होते. 'एनएसयूआय'च्या काळापासून त्यांनी काँग्रेससोबत काम केले. मात्र तिकीट वाटपावरून नाराज झालेल्या रणजितसिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यांनी आता पुन्हा एकाद काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
हेही वाचा - 'राज्यकर्ता पक्ष तिसऱ्या क्रमांकावर तरीही विजयाचा आनंद म्हणजे विनोदच'
हेही वाचा - दिवाळीचा आनंद घ्या, मात्र कोरोनाचे नियम पाळून - मुख्यमंत्री ठाकरेंचे नागरिकांना आवाहन