मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत हे त्यांच्या वक्तव्यामुळे अडचणीत सापडले आहेत. आमदार सुनील राऊत यांचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते भाजपाला शिव्या घालताना दिसत आहेत. जाहीर कार्यक्रमात केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण तापले आहे. त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर बोलताना विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मोठे बंधू ज्या पद्धतीने काम करत आहेत, त्यात आपण मागे पडू नये म्हणून छोटे बंधूही शिव्या देत आहेत, असे सांगत दरेकरांनी खासदार संजय राऊत व आमदार सुनील राऊत यांच्यावर निशाण साधला आहे.
'आता भाजपाला त्याची सवय झाली आहे' : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे खासदार संजय राऊत यांच्यावर भाजपा पहिल्यापासूनच संधी भेटेल तिथे आक्रमकपणे हल्ला करत आला आहे. त्यातच ईडीच्या चौकशीचा ससेमिरा सुद्धा राऊत यांच्या पाठीशी लागला असताना आता त्यांचे बंधु आमदार सुनील राऊत यांनी हे आक्षेपार्ह विधान करून नवीन वादाला तोंड फोडले आहे. एकंदरीतच या प्रकरणावर बोलताना विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी सुनील राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना त्यांच्याकडून अजून काय अपेक्षा केली जाऊ शकते, असे सांगितले आहे. आता भाजपाला त्याची सवय झाली असून एकीकडे आज सभागृहात मराठी भाषा विधेयक मंजूर होत असताना दुसरीकडे अशा पद्धतीच्या भाषेचा वापर करायचा हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये? : शैलेश शेट्टे नावाचा एका व्यक्तीने फेसबुकवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. भाजपाचे पदाधिकारी असल्याचे या व्यक्तीने आपल्या प्रोफाइलमध्ये लिहिल आहे. हा व्हिडिओ एका जाहीर कार्यक्रमातला असून शिवजयंतीच्या दिवशी भांडुपच्या खिंडीपाडा परिसरामध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते सज्जू मलिक यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आमदार सुनील राऊत यांनी असे विधान केले आहे.
हेही वाचा - Sanjay Raut ED : शिवसैनिकांच्या वडापावच्या गाडीवरही ईडी कारवाई करेल याची आता भीती वाटते - संजय राऊत