मुंबई - परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडी कार्यालयाने चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली होती. पण, अनिल परब चौकशीला हजर न राहता साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीसाठी रवाना झाले. याविषयी बोलताना भाजप नेते किरीट सोमैया यांनी अनिल परब यांच्यावर टीका करत म्हणाले, साईबाबांच्या दरबारात गेल्याने सबकुछ माफ होत नाही, असे सांगत आज ना उद्या, त्यांना चौकशीला सामोरे जावे लागेल. ते मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अनिल परब यांना किती दिवस लपविणार..? - किरीट सोमैया म्हणाले, अनिल परब यांना असे वाटते की कोरोना काळात घोटाळे करून, जनतेचे पैसे लुटून ते साई दरबारात गेले व साईबाबांचे दर्शन घेतले तर सबकुछ माफ होईल. पण, उद्धव ठाकरे यांना मी सांगू इच्छितो की राहुल गांधींनाही ईडी समोर जावे लागले. त्याप्रमाणे अनिल परब यांना ते किती दिवस लपवणार आहेत? आज ना उद्या तरी हिशोब द्यावाच लागणार आहे. म्हणून एक दिवस त्यांना चौकशीला सामोरे जावे लागेल, असे किरीट सोमैया म्हणाले.
हजर झाले नाही तर वॉरंट काढा - खरमाटे यांच्याशी तुमचे संबंध काय? तसेच सचिन वाझे यांनी पोलिसांच्या बदल्यांमध्ये जे पैसे कमावले ते पोलीस अधिकारी व पब मालकांकडून पैसे कमावून मंत्रालयात जमा केले आहेत. अनिल परब यांनी रिसॉर्ट बांधला आहे तो बेकायदेशीर आहे. तो पैसा कुठून आला ? अनिल परब प्रॉपर्टी टॅक्स नियमित भरत होते. आयकर विभागाच्या छाप्यात ते स्पष्ट झाले आहे. नियमित प्रॉपर्टी टॅक्स भरत होते पण तुम्ही 25 कोटींचा रिसॉर्ट बांधला त्याचा खर्च कुठे आहे? अनिल परब यांनी सदानंद कदम यांना रीसॉर्ट विकला. त्यांचा चार्टर्ड अकाऊंटंटने ते कबूल केले आहे. 2017-18 पासून 2020-21 पर्यंत सर्वकाही अनिल परब भरत होते. तर 6 कोटी 42 रुपयांचे पेमेंट सदानंद कदम यांनी कशासाठी केले, असा प्रश्नही किरीट सोमैया यांनी उपस्थित केला आहे?, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याप्रकरणाची चौकशी का करत नाहीत, असेही ते म्हणाले. पण, आज नाही तर उद्या अनिल परब यांना चौकशीला हजर राहावे लागेल. त्याचबरोबर अनिल परब चौकशीला हजर झाले नाहीत तर त्यांच्या नावाने अटक वॉरंट काढा, अशी विनंतीही त्यांनी ईडीला केली असल्याचे किरीट सोमैया म्हणाले. महाराष्ट्राची जनता आमच्यासाठी देव असून जे माफियागिरी करतात त्यांना ते कधीच माफ करणार नाहीत, असेही ते म्हणाले.
हेही वाचा - शंभरीपार केलेल्या साई मंदिराचे होणार मजबुतीकरण...