मुंबई - राज्यात झालेल्या नगरपंचायती, भंडारा-गोंदिया जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे निकाल आज (दि. 19 जानेवारी) घोषित झाला ( Local Body Election Result in Maharashtra ) आहे. निकालावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis on Election Result ) यांनी राज्यात भाजप हा एक नंबरचा पक्ष होता व राहील, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजप सदस्य संख्येतही एक नंबरचा पक्ष - महाविकासआघाडी सरकारकडून धनशक्ती, दंडशक्ती, सत्तेचा कितीही गैरवापर झाला तरी भाजपा हा क्रमांक एकचा पक्ष होता-राहील. भाजपच्या 24 आणि सहयोगी मिळून सर्वाधिक 30 नगरपालिकांमध्ये भाजपने सत्ता प्राप्त केली. सदस्यसंख्येतही सर्वाधिक 415 हून अधिक जागा जिंकत भाजप हाच क्रमांक एकचा पक्ष बनला आहे. जिल्हा परिषदा आणि नगरपालिका निवडणुकीत भाजपने मिळविलेल्या या दणदणीत यशाचे शिल्पकार आपले सारे कठोर परिश्रमी कार्यकर्ते आहेत. मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, असे फडवणीस यांनी जाहीर केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
मोदींच्या नेतृत्वावर जनतेला विश्वास - महाविकास आघाडी सरकारचा कारभार नाकारणार्या सर्व मतदारांचेही मन:पूर्वक आभार मानतो. कितीही पक्ष एकत्र आले तरी या देशातील जनता ही पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांच्याच नेतृत्त्वावर विश्वास ठेवते. हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. मोदींचे नेतृत्त्व आणि आपल्या कार्यकर्त्यांचे परिश्रम याचेच हे यश असल्याचे फडणवीस म्हणाले.